६३ पैकी चार ग्रा़पं़ ला अपंगांप्रती सहानुभूती
By Admin | Updated: January 22, 2015 02:02 IST2015-01-22T02:02:39+5:302015-01-22T02:02:39+5:30
अपंग पुनर्वसन कायदा १९९५ नुसार अपंगांच्या कल्याणासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रा़पं़ या स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या अर्थसंकल्पाच्या ३ टक्के निधी ...

६३ पैकी चार ग्रा़पं़ ला अपंगांप्रती सहानुभूती
प्रफूल्ल लुंगे सेलू
अपंग पुनर्वसन कायदा १९९५ नुसार अपंगांच्या कल्याणासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रा़पं़ या स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या अर्थसंकल्पाच्या ३ टक्के निधी अपंगांच्या पुनर्वसनावर खर्च करणे बंधनकारक आहे; पण ६३ पैकी केवळ चार ग्रा़पं़ नी विहित नमुन्यातील विवरणपत्रात नोंद घेतली़ इतर ग्रामपंचायती दुर्लक्ष करीत असल्याने अपंगांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे दिसते़ सेलू पं.स. अंतर्गत ६३ ग्रा.पं. मध्ये ५८२ अपंग आहेत़
ग्रापंचायातींना त्यांच्या मंजूर निधीच्या ३ टक्के खर्च अपंगांच्या कल्याणासाठी करणे अत्यावश्यक आहे. ग्रा़पं़ ने गावातील प्रत्येक अपंगाची जन्म-मृत्यू नोंदणीच्या आधारावर नोंदणी करण्याचे आदेश शासनस्तरावरून परिपत्रक काढून राज्यातील प्रत्येक ग्रा.पं. ला दिले. ग्रा़पं़ ने त्यांच्या हद्दीतील सर्व अपंगांची विहित नमुन्यातील विवरणपत्रात नोंदणी करावी व अपंगांच्या नोंदणीबाबत दरवर्षी आढावा घेऊन अपंग नोंदणी अद्यावत राहील याची काळजी घ्यावी, ही नोंदणी ग्रा.पं़चा कायम अभिलेख राहील, याबाबत दक्षता घ्यावी, असे नमूद आहे. त्या अनुषंगाने ६३ ग्रा़पं़ नी अपंगांच्या अद्यावत नोदंणीची यादी सादर केली़ यात ५८२ अपंगाची नोंद झाली़
या कामासाठी अपंगांच्या प्रहार संघटना प्रयत्नशील होत्या. त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे सतत पाठपुरावाही केला. शासन निर्णयाच्या १६ महिन्यानंतर का होईना, अपंगांची संख्या निश्चित होऊन यादी सादर करण्यात आली.
५९ ग्रा़पं़ चे नोंदीकडे दुर्लक्ष
तालुक्यातील ६३ पैकी हिंगणी, वडगाव (खुर्द), वडगाव (कला) व रिधोरा या चार ग्रामपंचायतींनी विहित नमुन्यातील विवरणपत्रासह यादीची नोंद केली़ ५९ ग्रामपंचायतींनी त्याकडे दुर्लक्षच केले आहे़ विहित नमुन्यात यादी न ठेवलेल्या ग्रा़पं़ मध्ये अपंगासाठी खर्च करणे बंधनकारक असलेला ३ टक्के निधी कसा खर्च होईल, हा प्रश्नच आहे़
अपंगांची यादी विहित नमुन्यात ठेवण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणताही नमुना आमच्याकडे देण्यात आला नाही व तशा सूचनाही नाही; पण विहित नमुना नसला तरी ग्रामसेवकांना सूचना देऊन रजिस्टर तयार करून त्यावर अपंगांचे नाव, अपंगत्वाचा प्रकार, अपंगाची टक्केवारी, अपंगाचे कारण आदी माहिती ठेवण्याच्या सूचना आम्ही सर्व ग्रामसेवकांना दिल्यात़ तसा रेकॉर्ड ठेवला जात आहे.
- एन.बी. बेताल, विस्तार अधिकारी, प.सं. सेलू.