आज ठरणार चार नवे नगराध्यक्ष!
By Admin | Updated: November 30, 2015 01:56 IST2015-11-30T01:56:02+5:302015-11-30T01:56:02+5:30
जिल्ह्यात जाहीर झालेल्या चारही नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाची निवडणूक सोमवारी होऊ घातली आहे.

आज ठरणार चार नवे नगराध्यक्ष!
आष्टी, कारंजा व समुद्रपूरचे चित्र स्पष्ट : सेलूत अंतर्गत गटबाजीला उधाण, नगराध्यक्षपद रहस्यमय
वर्धा : जिल्ह्यात जाहीर झालेल्या चारही नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाची निवडणूक सोमवारी होऊ घातली आहे. या चारही नगरपंचायतीच्या अध्यक्षामुळे जिल्ह्यात नव्या चार नगराध्यक्षांची भर पडणार आहेत. पहिल्यांदाच अस्तित्त्वात येत आलेल्या या चारही ठिकाणी आपला नगराध्यक्ष असावा अशी प्रत्येक राजकीय पक्षाची इच्छा आहे. यानुसार सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.
जिल्ह्यातील आष्टी (शहीद), कारंजा (घाडगे) व समुद्रपूर येथील चित्र स्पष्ट असले तरी सेलू तालुक्यात अस्थिरता कायम आहे. सेलूत घडत असलेल्या घडामोडींमुळे येथील नगराध्यक्षपद कोणाला मिळते याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहेत. सोमवारी होणार असलेल्या या चारही नगरपंचायतीत अध्यक्षपदाकरिता आठ नामांकन दाखल आहे. कारंजा येथे एक, आष्टीत दोन व सेलू येथे तीन तर समुद्रपूर येथे दोन नामांकन दाखल झाले आहेत.
यात कारंजा येथे काँग्रेसच्यावतीने बेबी कठाणे यांचा एकमेव अर्ज आला आहे. येथे काँग्रेसकडे १५ सदस्य आहेत. यामुळे अध्यक्षपदी त्यांची अविरोध निवड निश्चित मानली जात आहे. आष्टी येथे काँगे्रसकडे दहा तर भाजपच्या वाट्याला सहा जागा आहेत. येथे कॉग्रेसच्यावतीने मीरा येणुरकर तर भाजपच्यावतीने मनीष ठोंबरे रिंगणात आहे. काँग्रेसकडे दहा जागा असल्याने अध्यक्षपदाकरिता आवश्यक असलेला नऊचा आकडा आहे. समुद्रपूर येथे भाजपच्यावतीने शीला मधूकर सोनारे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सरिता राहूल लोहकरे यांनी नामांकन दाखल केले. येथे भाजपला संधी आहे. सेलूत दप्तरी गटाकडे-६, काँग्रेस (जयस्वाल गट)-५, भाजपा ३ व अपक्ष २ तसेच बसपाचा १ उमेदवार निवडून आल्याने स्पष्ट बहुमत कुणालाही मिळाले नाही. येथे एकूण तीन उमेदवार रिंगणात आहेत. यात दप्तरी गटाकडून शैलेंद्र दप्तरी तर जयस्वाल गटाच्यावतीने राजेश जयस्वाल तसेच भाजपाकडून गटनेत्या शैला सब्बीरअली सैयद यांचा अर्ज आहे.(प्रतिनिधी)
काँग्रेसच्या बेबी कठाणे
कारंजात काँग्रेसच्या बेबी कठाणे यांचा एकमेव अर्ज आला आहे. काँग्रेसकडे १५ सदस्य आहेत. यामुळे अध्यक्षपदी त्यांची अविरोध निवड मानली जात आहे.
आष्टीतही काँग्रेसच्या मीरा येणुरकर
आष्टी येथे काँगे्रसकडून मीरा येणुरकर, तर भाजपकडून मनीष ठोंबरे यांनी नामांकन दाखल केले आहे. काँग्रेसकडे सर्वाधिक १० सदस्य असल्याने मीरा येणुरकर यांची निवड निश्चित मानली जात आहे.
सुमद्रपुरात भाजपाच्या शीला सोनारे
समुद्रपूर येथे भाजपकडून शीला मधूकर सोनारे, तर राकाँकडून सरीता राहुल लोहकरे यांच्यात थेट निवडणूक होईल. आठ जागा भाजपाकडे असून दोन अपक्षांनी पाठींबा दिल्याने सोनारे यांना संधी आहे.
दफ्तरी भाजप वा काँगे्रसची मदत घेणार?
सेलूत काँग्रेसचे माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल यांनी शैलेश दफ्तरी यांच्याशी हातमिळवणी केली. आणि अशातच भाजपने काँग्रेसचे डॉ. राजेश जयस्वाल यांना नगराध्यक्षपदाची आॅफर दिल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. या घडामोडींमुळे जयस्वाल बंधूमध्येही अंतर्गत ठिणगी पडल्याची माहिती आहे. तसेच भाजपची ही अफलातून खेळी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचल्याची माहिती आहे. असे झाल्यास भाजपची भविष्यात अडचण होईल. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा भाजपाच्या माध्यमातून व्हीप जारी करुन शैलेश दफ्तरी यांनाच मतदान करण्याचे फर्मान सोडले आहे, तर दुसरीकडे विजय जयस्वाल हे सुद्धा दफ्तरी गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. विजय जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दफ्तरी गटाला दिलेला शब्द पाळणार असल्याचे सांगितले. यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दफ्तरी गट काँग्रेसच्या मदतीने सत्तेवर येतो वा भाजपच्या हेही बघण्यासारखे आहे, दुसरीकडे भाजपने डॉ. जयस्वाल यांना दिलेल्या नगराध्यक्षपदाच्या ‘आॅफर’चे काय होईल, याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे.