रेती चोरीप्रकरणी चार लाखांचा मुद्देमाल जप्त
By Admin | Updated: March 6, 2016 02:21 IST2016-03-06T02:21:48+5:302016-03-06T02:21:48+5:30
रेती चोरीला जिल्ह्यात उधान आले आहे. महसूल बुडवून रेतीची विक्री करण्याकडे चोरट्यांचे लक्ष आहे.

रेती चोरीप्रकरणी चार लाखांचा मुद्देमाल जप्त
सेवाग्राम पोलिसांची कारवाई : ट्रक क्रमांक व मार्गात फेरबदल
वर्धा : रेती चोरीला जिल्ह्यात उधान आले आहे. महसूल बुडवून रेतीची विक्री करण्याकडे चोरट्यांचे लक्ष आहे. सेवाग्राम पोलिसांनी तीन दिवसांत दुसरी कारवाई केली. यात रेतीसह टिप्पर जप्त करीत ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.
पोलिसांची गस्त सुरू असताना शुक्रवारी बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर ट्रक क्र. एम.एच. ३६/०२४४ आढळून आला. सदर ट्रकची तपासणी केली असता त्यात ओली रेती भरलेली आढळून आली. यात चालक संदीप अशोक वरखडे यास विचारणा केली असता त्याने सदर रेती ही वणा नदीतील चिंचोली रेतीघाट मांडगाव येथून आणल्याचे सांगितले. रॉयल्टीबाबत विचारणा केली असता त्याने रेतीघाटाच्या कंत्राटदाराकडील दिवानजीच्या मोबाईल क्रमांकावरून आलेला एसएमएस दाखविला. त्या मॅसेजची पाहणी केली असता सदर एसएमएसच्या इनव्हाईसवर रजिस्टर असलेला ट्रक हा एमएच ३२/ क्यू. ३१५० असा होता. शिवाय वाहनाच्या ये-जा करण्याची वेळ, व्हॅलिडीटी व रेतीचे प्रमाण यातही फेरबदल करण्यात आला होता. यावरून सदर इसमांनी शासनाकडून प्राप्त रेतीच्या इनव्हाईस एसएमएसमध्ये फेरबदल करून शासकीय रेती घाटावरून रेतीची चोरी केली. यातून शासनाचा महसूल बुडविलेला आहे.
यावरून ट्रक एम.एच. ३६/०२४४ चा चालक संदीप अशोक वरखडे (२५) रा. सिद्धार्थनगर बोरगाव (मेघे), ट्रकवरील मजूर संघपाल रामराव डोंगरे (२७) रा. टाकळी कानडा, ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती ह.मू. सतीश हाडके रा. प्रगतीनगर, जुनापाणी वर्धा व दिनेश गणेश सोनावणे (२९) रा. सिद्धार्थनगर बोरगाव (मेघे) तसेच रॉयल्टीचा खोटा एसएमएस तयार करण्यात सहभागी ठेकेदार व दिवाणजी वणा नदी चिंचोली घाट, समुद्रपूर यांच्या विरूद्ध सेवाग्राम पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. यात ट्रक, रेती व एक मोबाईल असा ४ लाख ८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत उदयसिंग बारवाल, दिवाकर परीमल, आनंद भस्मे, अमर लाखे, विलास लोहकरे यांनी केली.(कार्यालय प्रतिनिधी)
अवैध साठेबाजीलाही आले उधाण
महसूल मिळावा म्हणून जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव करण्यात आले. प्रत्येक घाटाला वाळू उपस्याची मर्यादाही ठरवून दिली; पण या मर्यादेचे उल्लंघन करीत रेतीचा उपसा केला जातो. या रेतीची अवैध साठेबाजी केली जाते. प्रशासनाकडून अनेकदा रेतीच्या ठिय्यावर कारवाई झाली आहे; पण साठेबाजी कमी होत नसल्याचेच दिसून येत आहे.