अग्रवाल पेट्रोल पंपावर चार तास खडाजंगी
By Admin | Updated: June 13, 2016 00:38 IST2016-06-13T00:38:09+5:302016-06-13T00:38:09+5:30
तळेगाव (श्या.पं.) येथील अग्रवाल पेट्रोल पंपावर ग्राहकांना रॉकेलमिश्रीत डिझेलचा पुरवठा होत असल्याचा प्रकार अघडकीस आला.

अग्रवाल पेट्रोल पंपावर चार तास खडाजंगी
नमुने पोलिसांच्या स्वाधीन : रॉकेलमिश्रीत डिझेल विकल्याचा आरोप
आष्टी (शहीद) : तळेगाव (श्या.पं.) येथील अग्रवाल पेट्रोल पंपावर ग्राहकांना रॉकेलमिश्रीत डिझेलचा पुरवठा होत असल्याचा प्रकार अघडकीस आला. याचा जाब विचाराला गेलेले वाहन मालक व पेट्रोल पंपधारक यांच्यात तब्बल चार तास खडाजंगी झाली. शेवटी डिझेलचे नमुने घेवून तळेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना शनिवारी घडली.
अग्रवाल पेट्रोल एजन्सी तळेगाव यांच्याकडे अकोला (गायगाव) येथून डिझेलचा पुरवठा होतो. सदर डिझेल ग्राहकांना विकल्या जाते. आष्टी येथील विपीन उमाळे यांनी त्यांच्या एमएच ३२ वाय ७११७ या वाहनात डिझेल भरले. ते येथील नियमित ग्राहक आहेत. नवीन घेतलेल्या गाडीचे अवघ्या दोन महिन्यात इंजीन खराब झाले. त्यांनी याची तपासणी केली असता डिझेलमध्ये रॉकेल असल्याचे निष्पन्न झाले. असाच प्रकार आर्वी येथील हितेश भुतडा यांच्याशी घडला. त्यांनी एमएच ३२ वाय २२०१ या वाहनात २० लिटर डिझेल भरले. यात रॉकेल निघाल्याने त्यांच्याही गाडीचे इंजिन खराब झाले. संतप्त दोन्ही वाहनमालकांनी शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता आणखी २० लिटर डिझेल विकत घेतले. यामध्ये जास्त प्रमाणात रॉकेल आढळून आले.
ग्राहक विपीन उमाळे व हितेश भुतडा यांनी पेट्रोलपंपमालक गोपालकृष्ण अग्रवाल यांना विचारले असता असा काही प्रकार नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली.
यावेळी दोन्ही ग्राहकांनी पेट्रोलपंपावर ठिय्या मांडला. याची माहिती होताच ग्राहक प्रवीण शेटे, प्रतिक माणिकपुरे, राजेश गोरे हे सुद्धा आले. या सर्वांनी पेट्रोलपंपमालकाला धारेवर धरत याची माहिती तहसीलदार गजभिये यांना दिली. मात्र त्यांच्या भावाचे लग्न असल्याने त्यांनी येण्यास नकार दिल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला. उपविभागीय महसूल अधिकारी आर्वीचे मनोहर चव्हाण यांना बोलाविले असता त्यांनीही येण्यास नकार दिला.