टाकळीच्या मंदिरातून चार मुकुट पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:43 IST2019-05-20T21:43:18+5:302019-05-20T21:43:42+5:30
नजीकच्या टाकळी येथील लक्ष्मी माता मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी तीस हजार रुपये किंमतीचे चार चांदीचे मुकुट चोरून नेले. ही घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

टाकळीच्या मंदिरातून चार मुकुट पळविले
लोकमत न्यूज नेटवर्क
झडशी : नजीकच्या टाकळी येथील लक्ष्मी माता मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी तीस हजार रुपये किंमतीचे चार चांदीचे मुकुट चोरून नेले. ही घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
मंदिरातील पुजारी नातलगाचे लग्न असल्याने बाहेरगावी गेला होता. तर देवस्थानचे सदस्य अशोक दोडके यांनी सकाळी ९ वाजता पुजा करून मंदिराला कुलूप लावले. इतकेच नव्हे तर कुलूपाची चाबी नेहमीप्रमाणे खिळ्याला अडकून ठेवली. दरम्यान गावातीलच वाल्मिक धानफोले हे पुजा करण्यासाठी मंदिरात गेले असता त्यांना मंदिर उघडेच असल्याचे दिसले. त्यांनी बारकाईने पाहणी केली असता चांदीचे मुकूट नियोजित ठिकाणी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मंदिर परिसरातील सात मूर्र्तींपैकी तीन मुर्तीवर मुकूट नसल्याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना देत मंदिरच्या सदस्यांना दिली. दरम्यान या घटनेची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली असून पुढील तपास जमादार दीक्षित करीत आहे.
काही दिवसांपूर्वीच काढले सीसीटीव्ही
सदर मंदिरात स्थानिक नागरिकांनी सीसीटीव्ही दान म्हणून दिले. मात्र, कंपनीला पूर्ण पैसे न मिळाल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ते सीसीटीव्ही काही दिवसांपूर्वीच काढून नेल्याचे सांगण्यात आले.