चार अंध मित्रांंची: ही दोस्ती तुटायची नाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:55 IST2018-09-04T23:54:18+5:302018-09-04T23:55:26+5:30
मित्र म्हटले की दुनियादारीच वेगळी असते. त्यातही चार मित्र एकत्र आल्यावर कोणतेही आवाहन पेलण्याचे बळ मिळते.असाच काहीसा प्रसंग वर्ध्यातील मुख्य मार्गावर अनेकांनी अनुभवला. या रहदारीच्या मार्गावरुन चार अंध मित्र एकामेंकाचा हात पकडून झपाझप पुढे चालत होते.

चार अंध मित्रांंची: ही दोस्ती तुटायची नाय!
गौरव देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मित्र म्हटले की दुनियादारीच वेगळी असते. त्यातही चार मित्र एकत्र आल्यावर कोणतेही आवाहन पेलण्याचे बळ मिळते.असाच काहीसा प्रसंग वर्ध्यातील मुख्य मार्गावर अनेकांनी अनुभवला. या रहदारीच्या मार्गावरुन चार अंध मित्र एकामेंकाचा हात पकडून झपाझप पुढे चालत होते. डोळसांनाही लाजवेल अशी त्यांनी ही ‘वाट’ चाल ‘ही दोस्ती तुटायची नाय’ या गाण्यांची आठवण करुन देणारी ठरली.
मिलिंद मोतेवार (४२), प्रकाश बावरी (४२) व मोहन कुलकर्णी तिघेही राहणार आर्वी व प्रशांत देऊळकर (३२) रा.वर्धमनेरी असे हे चौघेही अंध मित्र काही कामानिमित्त वर्ध्यात आले. यातील मिलिंद हे सामाजिक संस्थेत कार्यरत आहे. प्रकाश बावरी व मोहन कुलकर्णी स्वत:चा व्यवसाय करतात. तर प्रशांत देऊळकर हे वर्ध्यातील अंध विद्यालयात शिक्षक आहे. शहरातील आरती चौकातून हे चौघेही झपाझप पाऊल टाकत बसस्थानकाकडे निघाले. तसा वर्दळीचा हा रस्ता असला तरिही ते चौघेही आपल्याच दुनियेत एकामेकांच्या हातात हात देऊन गोष्टीगप्पा करीत चालू लागले.
विशेषत: वाहतुकीच्या नियमानुसार डाव्याबाजुनीच मार्गक्रमण करीत असतांना त्यांच्यातील डोळसपणाच जाणवला. परतु, त्यांच्या हातातल्या बंद स्टीक त्यांचे वास्तव सांगून गेल्या. या चौघानाही एकमेकांचा चेहरा माहिती नाही. मात्र, मनामध्ये असलेला मैत्रीचा धागा एकमेकांच्या हातातील स्पर्शाने इतका गुंतून गेला होता; की त्यांच्या मैत्रीचे अनेकांना कौतूक वाटलं. पण त्याच हेच वागणं नि:स्वार्थ मैत्रिची साक्ष देऊन गेलं, असं म्हटल्यास वावगे ठरू नये.