चार एकर शेतात रानडुकरांचा धुमाकूळ
By Admin | Updated: January 19, 2017 00:22 IST2017-01-19T00:22:13+5:302017-01-19T00:22:13+5:30
आठ दिवसांपूर्वी वाई गावातील शेतकऱ्याचा रानडुकरांनी हल्ला करून बळी घेतला.

चार एकर शेतात रानडुकरांचा धुमाकूळ
शेतकऱ्यांचे नुकसान : तूर, कपाशीचे पीक केले नष्ट
रोहणा : आठ दिवसांपूर्वी वाई गावातील शेतकऱ्याचा रानडुकरांनी हल्ला करून बळी घेतला. त्याच गावातील शेतकरी पुंडलिक गजकेश्वर यांच्या चार एकर शेतात रानडुकरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. कापणीला आलेली तूर व वेचणीला आलेल्या कापसाची रात्री नासाडी केली. यामुळे झालेला खर्च कसा भरून निघेल, बँकांचे कर्ज व उधारी कशी फेडावी तथा संसाराचा गाडा कसा हाकावा, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे.
वाई येथील पुंडलिक गजकेश्वर यांचे वाई शिवारात सर्व्हे क्र. ४५ मध्ये १.२४ हेक्टर शेत आहे. त्यांनी या शेतात तूर व कपाशीचे पीक घेतले होते. तुरीचे पीक कापणीचा आले होते तर अद्याप अर्धा कापूस निघायचा होता. कापसाचा वेचा फुटला होता. अशावेळी रात्री या शेतात रानडुकरांच्या कळपाने धुडगूस घालत संपूर्ण पीक नष्ट केले. यात शेतकऱ्याचे अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी कष्टाने पीक घेत आहे. त्याचे रक्षण करताना स्वत:चा जीव धोक्यात घालतो; पण श्वापदांमुळे पीक नष्ट होते. रोहणा परिसरातील वाई, पिंपळधरी या जंगलव्याप्त भागात गत काही दिवसांपासून जंगली श्वापदांचा हैदोस वाढला आहे. आठ दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यावर तुरीची कापणी करीत असताना रानडुकरांनी हल्ला करीत ठार केले. एक महिन्यापूर्वी याच शेत शिवारातील फनिंद्र रघाटाटे व अभिजीत बुरघाटे यांच्या शेतातील पिकांची नासधूस रानडुक्कर व रोह्यांनी केले. गजकेश्वर हे अल्पभूधारक व गरीब शेतकरी असून नुकसानामुळे ते खचले. वनविभागाने या प्रकरणात त्वरित आर्थिक मदत मिळवून द्यावी, श्वापदांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)