परीक्षेसाठी पाया मजबूत असावा
By Admin | Updated: August 12, 2016 01:42 IST2016-08-12T01:42:43+5:302016-08-12T01:42:43+5:30
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचे असल्यास त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला पाया मजबूत करणे गरजेचे आहे.

परीक्षेसाठी पाया मजबूत असावा
अंकित गोयल : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाची कार्यशाळा
वर्धा : स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचे असल्यास त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला पाया मजबूत करणे गरजेचे आहे. यासाठी दुसऱ्याचे अनुकरण न करता स्वत: सकारात्मक दृष्टीने विचार करून अभ्यास केल्यास यशाचे शिखर गठाण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाच्या कार्यशाळेत केले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाची कार्याशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, सहायक उपजिल्हाधिकारी स्वप्नील तागडे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे प्रोफेसरी अधिकारी वैभव गावंडे, नियोजन विभागाचे लेखाधिकारी प्रतापराज म्हसाळ, शासकीय जिल्हा ग्रंथपाल अ.नि. मंडपे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी चालू घडामोडीबाबत पुस्तके वाचावित. यासाठी वर्तमानपत्रे, मासिके, न्यूज चॅनल यासारख्या माध्यमाचा उपयोग करून घ्यावा. तसेच गणित, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान या पुस्तकाचा जास्त प्रमाणात अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करावा, असा सल्ला गोयल यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
जिल्हाधिकारी नवाल यांनी यावेळी स्पर्धा परीक्षेच्या कार्यशाळा मार्गदर्शन वर्ग चालविण्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात काय करायचे आहे. याचे आधी नियोजन आताच करणे गरजेचे असून जीवनात काय साध्य करायचे आहे. त्याचे एक लक्ष ठेवून कार्य करावे. यासाठी आपण सर्व समाजाचा विकास करण्याचे ध्येय ठेवत सकारात्मक विचार करून समाजात बदल घडवून आणण्याचे कार्य करावे, असे ही ते म्हणाले.
सहायक उपजिल्हाधिकारी स्वप्नील तागडे, वैभव गावंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशासकीय कामाकाजाची माहिती होण्यासाठी व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत प्रेरणा मिळावी यासाठी निवड समितीद्वारे एका विद्यार्थ्यांनी निवड करण्यात येते. त्याला जिल्हाधिकारी किंवा उच्च दर्जाच्या प्रशासनिक अधिकाऱ्यासोबत दिवसभर राहून प्रशासनिक कामकाजाचा अनुभव दिला जातो. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाच्या कार्यशाळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग व भारतीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेली दिपाली जैस्वाल या विद्यार्थिनीची समितीने निवड केली असून २० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत दिवसभर राहून प्रशासकीय कामकाजाचा अनुभव घेणार आहे. कार्यशाळेला स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे शाळा कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.(प्रतिनिधी)