देवळी (वर्धा) : भाजपचे माजी खासदार रामदास तडस व त्यांच्या अर्धांगिनी तथा माजी नगराध्यक्षा शोभा तडस यांना येथील राम मंदिरात रविवारी जानवं, सोवळं घातलं नसल्याचे कारण देत पूजाअर्चा करण्यास मज्जाव करण्यात आला. इतकंच नाही तर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन राम दर्शन करण्यापासूनही रोखण्यात आले. यामुळे भाविकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रविवारी (७ एप्रिल) रामनवमीच्या निमित्ताने माजी खासदार रामदास तडस हे सकाळी १० वाजता पत्नीसह येथील राम मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. मात्र, मंदिर विश्वस्त प्रा. मुकुंद चौरीकर यांनी 'तुम्ही जानवे व सोवळे घातले नाही. गाभाऱ्यात येऊन दर्शन घेऊ शकत नाही', असे सांगत त्यांना रोखले.
...अन् प्रकरण पोहोचले हाणामारीपर्यंत
रामनवमीच्या मुहूर्तावर हा प्रकार घडल्याने सर्वजण थक्क झाले. शेवटी माजी खासदार तडस गाभाऱ्याबाहेरील श्री संत गणपतराव महाराज यांच्या समाधीला हारार्पण करून परत गेले. यावेळी ट्रस्टीने एका भाविकांवर पट्टा उगारला. त्यामुळे हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले होते.
वाचा >>मुस्लीम RSS मध्ये येऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले...
देवळी येथे बाजार चौकात प्रभू रामचंद्र यांचे प्राचीन मंदिर आहे. अनेकांनी मंदिराला जमिनी दान दिल्या आहेत. सध्या देवस्थानचे अध्यक्ष व काही संचालक बाहेरगावी राहतात. ते केवळ उत्सवासाठी येतात. श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा लोकवर्गणीतून काढली जाते. नागरिक एक समिती गठीत करून धार्मिक कार्य पार पाडतात.
आमदारांनी ठणकावले, विचारला जाब
माजी खासदार रामदास तडस यांना पूजा करण्यास मज्जाव केल्याची माहिती मिळताच दुपारी १२:३०वाजताच्या सुमारास आमदार राजेश बकाने यांनी राम मंदिर गाठून वादग्रस्त विश्वस्त प्रा. चौरीकर यांना फैलावर घेतले.
ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य यांनाही खडेबोल सुनावले. देवस्थानचे वाटोळे सहन करणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली. हा प्रकार राम जन्मोत्सव झाल्यानंतर घडला.
प्रवेश करण्यापासून रोखले, विनंतीही नाकारली
या प्रकाराबद्दल माजी खासदार रामदास तडस म्हणाले की, "श्रीराम नवमीनिमित्त राम मंदिरात सपत्नीक गेलो होतो. तेथे पूजा, दर्शन करण्यास मनाई करण्यात आली. सोबतच्या कार्यकर्त्यांनी याबाबत विचारणा केली असता केवळ सोवळे घातलेल्या व्यक्तीलाच गाभाऱ्यात प्रवेश असल्याचे सांगण्यात आले. गणपत महाराजांच्या समाधी मुखवट्याला हारार्पण करू देण्याची विनंती केली असता तीसुद्धा नाकारली."