मानधन वाढीसाठी आशा सेविकांचे धरणे
By Admin | Updated: November 11, 2015 01:29 IST2015-11-11T01:29:29+5:302015-11-11T01:29:29+5:30
जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आशा सेविकांनी विविध मागण्यांकरिता सिटू नेतृत्त्वात धरणे आंदोलन केले.

मानधन वाढीसाठी आशा सेविकांचे धरणे
निदर्शने : विविध समस्यांकडे वेधले लक्ष
वर्धा : जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आशा सेविकांनी विविध मागण्यांकरिता सिटू नेतृत्त्वात धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने देण्यात आले. आशा सेविकांना दरमहा १० हजार रूपये मानधन देण्यात यावे, या प्रमुख मागणी विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सशक्त करण्याकरिता आशा सेविकांची नियुक्ती करण्यात आली. ग्रामीण जनता व आरोग्य विभाग यांच्यातील दुवा म्हणून त्या काम करतात. गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण, प्रसुतीसाठी महिलांना स्वखर्चाने त्यांना सरकारी दवाखान्यात पोहचविणे आदी माके त्या करतात. त्यांना रुग्णाप्रमाणे शासन त्यांना मानधन देते. मात्र यात ठराविक असे मानधन मिळत नाही. याकरिता दरमहा किमान वेतनाप्रमाणे १० हजार रूपये मानधन द्यावे, अशी मागणी आशा वर्कर कर्मचारी संघटनेने यावेळी केली.
याशिवाय या सेविकांना नोंद ठेवण्याकरिता दरमहा ५०० रुपये भत्ता मंजूर करण्यात आला. परंतु तो अद्याप देण्यात आला नाही. याशिवाय त्यांनी केलेल्या कामाचाही मोबदला वेळेवर मिळत नाही. शेकडोंच्या संख्येने कार्यरत असलेल्या आशांना विना वेतन काम करावे लागते. शासनाकडून आशा सेविकांचे आर्थिक शोषण केले जात आहे. किमान वेतनाचा स्वत:चा कायदा सरकारच पाळत नाही. असा आरोप निवेदनातून करण्यात आला. सिटूचे सिताराम लोहकरे यांनी आंदोलना दरम्यान आशा सेविकांना मार्गदर्शन केले. या मागण्यांचे निवेदन सहाय्यक आरोग्य अधिकारी ढवळे यांना शिष्टमंडळाने सादर केले.
आशा सेविकांचा मोबदला शासनाकडे थकीत आहे. निधी प्राप्त होताच ही थकबाकी अदा केली जाईल, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले. निवेदन सादर करताना सिताराम लोहकरे, संध्या खैरकार, सुनिता धोंगडे, सावित्री येडमे, चंदा सराम, सुनिता येळणे, प्रतिभा वानखेडे, भैय्या देशकर वसुंधरा वाळके व सेविकांचा सहभाग होता. आंदोलनात संगीता पाटील, कल्पना फरासे, वनमाला मंडेलिया, प्रणिता वाघमारे आदींचा सहभाग होता.(स्थानिक प्रतिनिधी)