सणासुदीत २४ तास वीज देण्याचा विसर
By Admin | Updated: November 4, 2016 01:48 IST2016-11-04T01:48:19+5:302016-11-04T01:48:19+5:30
गणपती व नवरात्रोत्सवात २४ तास विद्युत देण्यात आली. परंतु, ऐन दिवाळीतच वेळी अवेळी

सणासुदीत २४ तास वीज देण्याचा विसर
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना फटका
रोहणा : गणपती व नवरात्रोत्सवात २४ तास विद्युत देण्यात आली. परंतु, ऐन दिवाळीतच वेळी अवेळी विद्युत पुरवठा खंडीत केल्या जात असल्याने गावकऱ्यांसह शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे. सदर प्रकारामुळे महावितरण कंपनीबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत आहे. याकडे संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत दिवाळीच्या दिवसात २४ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, दरवर्षी विद्युत वितरण कंपनीच्या वतीने गणपती, नवरात्र व दिवाळी या उत्सवाच्यावेळी २४ तास विद्युत देऊन उत्सव भेटच दिली जात होती. सदर सुविधा रबी हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत होती. वेळीच विद्युत पुरवठा सुरळीत राहत असल्याने शेतकऱ्यांनाही ओलीताची कामे पूर्ण करता येत होती. मात्र, सध्या कधी दिवसाला तर कधी रात्रीला विद्युत पुरवठा खंडीत केल्या जात आहे. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणित वाढ झाली आहे. यावर्षीच्या दिवाळी पर्वावर नियमित विद्युत पुरवठा महावितरण कंपनी करेल ही शेतकऱ्यांना आशा होती. तूर व कपाशीच्या पिकाला पाण्याची गरज असतानाच विद्युत पुरवठा खंडित केल्या जात आहे. वेळीच पाणी न मिळाल्यास उत्पादनात घट येईल, असे शेतकरी सांगतात. यंदा सुरूवातीला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला. व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत असलेल्याची ओरड असतानाच आता महाविरणही विद्युत पुरवठा खंडीत करून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. विद्युत पुरवठा नसल्याचा सर्वाधिक त्रास लहान मुलं व वृद्धांना सहन करावा लागत असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)