अग्निस्फोटाची धग कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 20:43 IST2019-05-30T20:43:04+5:302019-05-30T20:43:44+5:30
आशिया खंडातील सर्वांत मोठे दारूगोळा भांडार असलेल्या केंद्रीय दारुगोळा भांडारात ३१ मे २०१६ च्या मध्यरात्री १.३० वाजता भयंकर अग्निस्फोट झाला. यात सेनेतील दोन अधिकाऱ्यासह १९ कर्मचारी व जवानांना वीरमरण आले तर कित्येक सैनिक व अग्निशमन दलातील जवान जखमी झाले होते.

अग्निस्फोटाची धग कायमच
प्रभाकार शहाकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : आशिया खंडातील सर्वांत मोठे दारूगोळा भांडार असलेल्या केंद्रीय दारुगोळा भांडारात ३१ मे २०१६ च्या मध्यरात्री १.३० वाजता भयंकर अग्निस्फोट झाला. यात सेनेतील दोन अधिकाऱ्यासह १९ कर्मचारी व जवानांना वीरमरण आले तर कित्येक सैनिक व अग्निशमन दलातील जवान जखमी झाले होते. त्यात स्थानिक पाच कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
रात्रीच काळ्याकुट्ट अंधारात किंकाळ्या, हादरे, पळापळ व भयग्रस्तांचा आक्रोशामुळे शहर व परिसर हादरून गेला. त्या काळाकुट्ट घटनेतील थरार पाहाता पुन्हा नको त्या काळ्याकुट्ट घटनेच्या आठवणी असे म्हणण्याची वेळ आली असली तरी ज्या वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती देवून जिल्ह्यातील लाखो नागरिकांचा जीव वाचविला त्यांना कधीच विसरता येणार नाही. त्या १९ विरांचे स्मारक दारुगोळा भांडारात असले तरी शहरवाशी दर वर्षी ३१ मे रोजी या शहीदांचे स्मरण करुन त्यांना मानाचा मुजरा करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात.
३१ मे २०१६ च्या काळाकुट्ट थरारात लिलाधर चोपडे, अमित दांडेकर, बाळू पाखरे, अमोल येसनकर, प्रमोद मेश्राम या अग्निशमन दलातील जवानांचा सहभाग होता. लिलाधर चोपडे यांच्या मागे पत्नी शोभा व वर्षा, पल्लवी, काजल या उपवर झालेल्या बेरोजगार मुली, अमित दांडेकर यांच्यामागे पत्नी प्राची व आठ वर्षाचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी आहे. विशेष म्हणजे अमितचे वडील व दोघे भाऊसुद्धा संरक्षण विभागाच्या सेवेतच आहेत. बाळू पाखरे या कर्तबगार शहिदामागे पत्नी, जावई, मुलगा व वृद्ध आई आहे.
अमोल येसनकर हा ऐन उमेदीच्या काळातच आपल्याला सोडून गेल्याचा दु:ख त्याच्या वृद्ध माता पित्यास आहे. तर प्रमोद मेश्राम यांची पत्नी व १२ वर्षांचा पार्थ व ४ वर्षाचा यथार्थ आजही आपले बाबा परत येणार या प्रतीक्षेत आहेत.
घटनेला तीन वर्षे लोटूनही अग्निस्फोटाची धग कायम आहे. वीरांच्या कुटुंबाला शहिदांना मिळणाऱ्या सर्वसोईसवलती देण्याची व शहीद कुटुंबाला २५ लाख देण्याची घोषणा, कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घेणे या वीरांना शहीदांचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु या घटनेतील १९ पैकी संरक्षक विभागातील अधिकारी व सैनिक यांना शहिदांचा दर्जा देण्यात आला. तर इतरांना सिव्हिलियन म्हणून दर्जा देण्याचे नाकारण्यात आले. वास्तविक पाहाता संरक्षण विभागातील अग्निशमन यंत्रणाही अत्यावश्यक सेवा म्हणून शासकीय सेवा समजली जाणे आवश्यक आहे.
या मागणीसाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये दिल्ली येथे या परिवारातर्फे आंदोलनही करण्यात आले होते. परंतु शासनाने दखल घेतली नाही. खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत प्रश्नही उपस्थित केला होता.
या शहीद कुटुंबांना सर्व सोयी उपलब्ध करून दिल्याचे शासन सांगत असले तरी शहीद पाखरे व येसनकर परिवारास अद्यापही कुठलीही राशी मिळाली नसून शहीद परिवारातील भंडारा येथील शहीद धनराज मेश्राम व स्थानिक प्रमोद मेश्राम या दोन वीरांच्या पत्नींना शासकीय सेवेत घेतल्याची माहिती शहीद बाळू पाखरे परिवाराचे विक्की पाखरे यांनी लोकमतला दिली.
गावांच्या पुनर्वसनाचा निर्णय कागदोपत्रीच
दारूगोळा भांडारात वारंवार होणाºया या भयानक घटनेतून भांडारालगतच्या नाचणगाव, पिंपरी (खराबे), आगरगाव, नागझरी या गावांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात यावे, असा निर्णय शासनदरबारी झाला असतानाही हा निर्णय अनेक वर्षांपासून कागदोपत्रीच राहिला. आता तरी हा प्रश्न ऐरणीवर येईल का? असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.