अन्न वाचवा मोहिमेची मुहूर्तमेढ

By Admin | Updated: March 29, 2017 00:54 IST2017-03-29T00:54:08+5:302017-03-29T00:54:08+5:30

मंगल कार्यालये, हॉटेल तथा उपहारगृहांमध्ये अन्न शिल्लक राहते. शिवाय अनेक जण प्लेटमध्येही अन्न शिल्लक ठेवतात.

Food safety campaign | अन्न वाचवा मोहिमेची मुहूर्तमेढ

अन्न वाचवा मोहिमेची मुहूर्तमेढ

मंगल कार्यालयांचा सहभाग : गुढी पाडव्याला शुभारंभ
हिंगणघाट : मंगल कार्यालये, हॉटेल तथा उपहारगृहांमध्ये अन्न शिल्लक राहते. शिवाय अनेक जण प्लेटमध्येही अन्न शिल्लक ठेवतात. हे अन्न वाया जात असतानाच काही बालके अन्नाविना मृत्यूमुखी पडतात. ही बाब लक्षात घेत पर्यावरण संवर्धन संस्था व लोकसाहित्य परिषदेच्यावतीने ‘अन्न वाचवा’ ही जणजागृती मोहीम सुरू करण्यात आली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. शहरातील मंगल कार्यालयांनी यात सहभाग घेऊन आदर्श घालून दिला आहे.
मंगल कार्यालये लग्न आणि इतर शुभ कार्यांसाठी सोयीस्कर असल्याने शहरी नागरिकांसोबतच आता ग्रामीण भागातील लोकही मंगल कार्यालये शुभ कार्यासाठी वापरताना दिसतात. परिणामी, दररोज बहुतेक कार्यालये बुक असतात. सर्व कार्य जरी यथोचित पार पडले तरी सर्वात मोठी समस्या असते उर्वरित आणि प्लेट्समध्ये शिल्लक ठेवलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे. बुफेचे फॅड असल्याने मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडीच होते. एकीकडे अन्नावाचून मुले मरत असताना मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाऊ नये म्हणून येथील पर्यावरण संवर्धन संस्था आणि लोकसाहित्य परिषदेच्यावतीने ‘अन्न वाचवा’ ही जणजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यातील एक भाग म्हणून हिंगणघाट शहरातील मोठ्या मंगल कार्यालयांच्या संचालकांची भेट घेऊन या समस्येवर चर्चा करण्यात आली. या मोहिमेला मंगल कार्यालय संचालकांनीही सहकार्य करण्याचे ठरविले असून यातून त्यांनी एक अनोखा आदर्शच घालून दिला आहे.
मोहिमेला माजी नगरसेवक जनार्धन निखाडे, भास्कर कलोडे, विजय राठी, राजेंद्र राठी, नगरसेवक चंदू मावळे, रमेश दीक्षित, पांडुरंग तुळसकर, जी.एम. लॉनचे भुते, लक्ष्मी कार्यालयाचे महाकाळकर आदींनी सहकार्य करीत मोहीम यशस्वी करण्याची ग्वाही दिली. पर्यावरण संवर्धन संस्थेच्यावतीने अन्नाची नासाडी न करता बचतीचे आवाहन करण्यात आले. यावेळी आशिष भोयर, प्रा अभिजीत डाखोरे, प्रदीप गिरडे, रमेश झाडे, ज्ञानेश्वर चौधरी, राजेंद्र कोंडावार, मनोहर ढगे, गौरव जामुनकार, गिरीधर काचोळे, योगेश तपासे, छत्रपती भोयर तसेच दोन्ही संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी मंगल कार्यालयांचे अनेक सामाजिक संस्थांनी कौतुक केले असून पर्यावरण प्रेमींनी या उपक्रमाचे स्वागत केले.(तालुका प्रतिनिधी)

सहा कार्यालयांमध्ये लावले फलक
अन्न वाचवा या मोहिमेच्या अनुषंगाने दोन मोठे फलक तयार करण्यात आले आहेत. यातील एका फलकावर अन्न वाचविणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या फलकावर एका भुकेल्या मुलाचे छायाचित्र काढण्यात आले आहे. तो डॉक्टरला भूक लागू नये म्हणून औषधी मागत असल्याचा आशय रंगविण्यात आला आहे. या फलकांतून अन्न वाचविण्याची पे्ररणा मिळणार आहे.
सदर फलक मंगल कार्यालयांतील जेवणाच्या हॉलमध्ये लावण्यात आले आहेत. मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे फलक शहरातील कलोडे सभागृह, निखाडे सभागृह, माहेश्वरी भवन, मोहता भवन, शिवसुमन भवन आणि लक्ष्मी भवन या कार्यालयांमध्ये लावण्यात आले आहेत. या मंगल कार्यालयांच्या संचालकांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

 

Web Title: Food safety campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.