निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा अर्धवटच
By Admin | Updated: October 16, 2016 01:51 IST2016-10-16T01:51:48+5:302016-10-16T01:51:48+5:30
धनोडी (बहाद्दरपूर) येथे वर्धा नदीवर निम्न वर्धा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाच्या कालव्याचे काम निधी अभावी रखडले आहे.

निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा अर्धवटच
निधीची चणचण : देखभाल, दुरूस्तीच्या कामांचाही खोळंबा
वर्धा : धनोडी (बहाद्दरपूर) येथे वर्धा नदीवर निम्न वर्धा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाच्या कालव्याचे काम निधी अभावी रखडले आहे. ही कामे जलदगतीने पूर्ण करण्याची ग्वाही शासनाकडून देण्यात आली; पण अद्याप निधीच नसल्याने कामाला प्रारंभच झाला नाही. परिणामी, अद्याप कालवा अर्धवट असून पूर्ण झालेल्या कालव्याच्या देखभाल, दुरूस्तीकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसून येत आहे.
वर्धा, अमरावती व यवतमाळ या तीन जिल्ह्यांना वरदान ठरणारा निम्न वर्धा प्रकल्प पूर्णत्वास आला; पण अद्याप कालव्याचे काम पूर्ण न झाल्याने तो कुचकामी ठरत आहे. २५ वर्षांतही शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पाहोचत नसल्याने सिंचनाचे स्वप्न धूसर झाल्याचेच चित्र आहे. निम्न वर्धा प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी भेटी दिल्या. त्यावेळी निधी देत कामे पूर्ण करण्याची ग्वाहीही देण्यात आली; पण अद्याप कुठल्याच हालचाली झाल्या नाहीत. यामुळे कालवा पूर्ण होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निम्न वर्धा कालवे विभागाने याकडे लक्ष देत निधीसाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
गेटवर चोरट्यांची वक्रदृष्टी
गुंजखेडा परिसरात मुख्य डाव्या कालव्याला गेट बसविण्यात आले आहेत. या कालव्याची देखभाल, दुरूस्तीच केली जात नसल्याने दयनीय अवस्था आहे. शिवाय गेटवरही चोरट्यांची वक्रदृष्टी असल्याचे दिसते. यामुळे ते चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालवे विभागाने याकडे लक्ष देत देखभाल, दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे.