फॉगिंग मशिन होणार कालबाह्य
By Admin | Updated: March 13, 2015 02:11 IST2015-03-13T02:11:16+5:302015-03-13T02:11:16+5:30
डासांचा नायनाट व्हावा व गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, या उद्देशाने फॉगिंग मशिनची खरेदी करण्यात येते़ स्थानिक ग्रा़पं़ नेही ..

फॉगिंग मशिन होणार कालबाह्य
विजय माहुरे सेलू
डासांचा नायनाट व्हावा व गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, या उद्देशाने फॉगिंग मशिनची खरेदी करण्यात येते़ स्थानिक ग्रा़पं़ नेही चार वर्षांपूर्वी फॉगिंग मशिन खरेदी केल्या; पण त्या नादुरूस्त असल्याने धुरळणी कशी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे़
तालुक्यात ६३ ग्रामपंचायती असून आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या २१ ग्रामपंचायतींनी या फॉगींग मशिन २०१०-११ मध्ये खरेदी केल्या. बहुतांश मशिनची किंमत प्रत्येकी २५ ते २८ हजार रुपये आहे़ पहिल्या वर्षी सदर यंत्रण तालुक्यात धुरळणीकरिता आले़ कालांतराने या मशिनी एका मागून एक नादुरूस्त होण्याचा प्रकार सुरू झाला़ मागील वर्षी तालुक्यातील ग्रामस्थांनी धुरळणी करण्याची मागणी केली़ त्यावेळी दुसऱ्या गावातून मशीन आणून नावापुरती धुरळणी करून बोळवण करण्यात आली़ सद्यस्थितीत ४ मशिन सुस्थितीत असून यात हिंगणी, घोराड, जुनोना व खापरी आणि शिवनगाव या ग्रा़पं़ चा समावेश आहे़ १७ मशिन मात्र कालबाह्य झाल्या आहेत़ या मशिन २०१०-११ मध्ये पंचायत समिती स्तरावरून ग्रा़पं़ च्या नावाने बिल देऊन पाठविण्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे. ज्या कंपनीकडून (एजन्सी) या मशिनचा पुरवठा करण्यात आला, ती एजन्सी दुरूस्तीसाठी पुढे येत नसल्याने या मशिनची दुरूस्ती कुठे करावी, असा प्रश्न ग्रा़पं़ समोर उभा ठाकला आहे. तीन ते चार वर्षे धुरळणी केल्यानंतर मशिनी पडल्या़ यामुळे पुन्हा कडूनिंबाचा पाला जाळून डास पळविण्याचा जुन्याच पद्धतीने आटापिटा करण्याची वेळ तालुक्यावर येणार काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे़
सदर फॉगिंग मशिनची दुरूस्ती अशक्य असल्याने पुन्हा त्या खरेदी करण्यास कुणीही उत्सुक नसल्याचेच दिसते़ यामुळे फॉगिंग कालबाह्य होणार, असे चित्र आहे़ तुडूंब भरलेल्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी बहुतांश ग्रा़पं़ मध्ये बारमाही सफाई कामगार नसल्याने तर काही ग्रा़पं़ची आर्थिक बाजू भक्कम नसल्याने गाळ उपसण्याच्या कामाला गती मिळत नाही. यामुळे डासांचे प्रमाण वाढण्यास मदत होते़ धुरळणी यंत्र नसल्याने डासांवर आळा कसा घालणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे़