तंत्रज्ञानामुळे चारा संकट
By Admin | Updated: February 22, 2015 01:55 IST2015-02-22T01:55:09+5:302015-02-22T01:55:09+5:30
शेतातील माल काढण्यासाठी यंत्राचा उपयोग होत असल्याने जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण होत आहे. यंत्रांद्वारे पिकांची काढणी होत असल्याने ...

तंत्रज्ञानामुळे चारा संकट
वर्धा : शेतातील माल काढण्यासाठी यंत्राचा उपयोग होत असल्याने जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण होत आहे. यंत्रांद्वारे पिकांची काढणी होत असल्याने गुरांकरिता चाराच शिल्लक राहत नसल्याची स्थिती आहे़ यामुळे गुरांच्या चाऱ्यासाठी गोपालक व शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत असल्याचे दिसते़
शेतकरी आपला माल लवकर निघावा म्हणून सोयाबीन हायवेस्टर या यंत्राने काढताना दिसते़ या यंत्रामुळे काढणी झाल्यावर जे कुटार निघत होते, ते सर्व शेतात पसरते. शिवाय गव्हाचा गव्हांडा काही प्रमाणात सोयाबीनच्या कुटारात मिसळून ते जनावरांच्या खाण्यासाठी उपयोगात येत होते़ आता तो सुद्धा शेतातच पसरविला जातो़ जनावरांसाठी तुरीचे कुटार हे महत्त्वाचे असते. यात गव्हाचा गव्हांडा मिसळून तो पावसाळ्यात गाई, बैलांना चारण्यासाठी साठवून ठेवला जातो; पण अलिकडे शेतकरी यंत्रानेच थोड्या बचतीसाठी पिकांची काढणी करताना दिसतात़ यामुळे तुरीचे कुटारही उपलब्ध होत नाही.
हेडंम्बा या मशिनने तुरी काढल्यास त्या मशिनमध्ये संपूर्ण तुरीची बांधलेली पेटी टाकली जाते़ यातून बाहेर येणारे कुटार एकदम बारिक होऊन त्यात जाड तुरीच्या झाडाचे तुकडे धारदार असतात. एकदम बारिक झालेले कुटार जनावरे खात नाहीत़ जे धारदार तुकडे असतात, ते खाताना जनावरांना इजा होऊन जनावरे दगावण्याची शक्यता असते. थ्रेशर मशिनने शेतातील माल काढल्यास जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत नाही; पण मजुरांचा अभाव व वेळेची बचत करण्यासाठी शेतकरी या यंत्राकडे वळला आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी चारा वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)