प्रवाहित तारा ४५ दिवस जमिनीवर
By Admin | Updated: November 8, 2014 22:42 IST2014-11-08T22:42:45+5:302014-11-08T22:42:45+5:30
विजेचे खांब तुटल्याने गत ४५ दिवसांपासून वीज प्रवाहित तारा जमिनीवर लोळत आहेत़ तक्रारी करूनही दुरूस्ती होत नसल्याने ग्रामस्थांनीच लाकडी खांबाच्या साह्याने वीज प्रवाह सुरू केला़ हा प्रकार

प्रवाहित तारा ४५ दिवस जमिनीवर
अमोल सोटे - आष्टी (शहीद)
विजेचे खांब तुटल्याने गत ४५ दिवसांपासून वीज प्रवाहित तारा जमिनीवर लोळत आहेत़ तक्रारी करूनही दुरूस्ती होत नसल्याने ग्रामस्थांनीच लाकडी खांबाच्या साह्याने वीज प्रवाह सुरू केला़ हा प्रकार माणिकनगर येथे प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर उघड झाला़ ४५ दिवसांतही विद्युत खांब आणि तारांची दुरूस्ती होत नसल्याने आश्चर्यच व्यक्त होत आहे़
माणिकनगर ग्रामपंचायतमधील १५ कुटुंबाला गत ४५ दिवसांपासून विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ व अनागोंदी कारभाराचा फटका बसत आहे. निकृष्ट दर्जाच्या सिमेंट खांबावर असलेली वीजवाहिनी दोन्ही खांब तुटल्याने जमिनीवर लोळत आहे़ यामुळे नागरिकांच्या घरात अंधार झाला. विद्युत प्रवाहित तारा जमिनीवर पडून असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली़ यास ४५ दिवसांचा कालावधी लोटला; पण अद्याप दुरूस्ती करण्याचे सौजन्य कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दाखविले नाही. शेवटी गावकऱ्यांनीच एका लाकडी खांबाच्या साह्याने दुसऱ्या ठिकाणाहून वीजप्रवाह सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अशी घटना माहिती नाही म्हणत तात्काळ दुरूस्तीसाठी आदेश देणार असल्याचे सांगितले.
आष्टी-मोर्शी रोडवर माणिकनगर वसाहत आहे. पुनर्वसीत ग्रामपंचायत हद्दीतील कामे करताना शासकीय अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले आहे़ विजेसाठी जमिनीत गाडलेले सिमेंट काँक्रीटचे खांब निकृष्ट दर्जाचे बसविण्यात आले़ रस्त्याच्या एका बाजूला वस्ती आणि दुसऱ्या बाजूला गुरांचा दवाखाना आहे. वस्तीच्या बाजूने प्रवीण बेलखेडे, नामदेव अमदरे, किसना कुरवाडे, तुळशीराम भालेराव, श्रीकृष्ण नांदणे, गजानन कुरवाडे, मारोती नांदणे यांची घरे आहेत़ या घरांचा प्रवीण बेलखेडे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या खांबावरून वीजपुरवठा सुरू होता. पावसाळ्यात दि. २३ सप्टेंबर रोजी वादळामध्ये दोन्ही खांब तुटून पडले़ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या जवळ असलेला खांब तर भिंतीवरच कोसळला़
दोन्ही खांब तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. नागरिकांनी याबाबत विद्युत वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता कार्यालय माणिकनगर येथे माहिती दिली़ येथे कार्यरत अभियंता एम.एम. पेठे यांनी ग्रामस्थांना आवठडाभरात वीजवाहिनी दुरूस्त करण्यात येईल, असे सांगितले़ गावात सर्वत्र काळोख पसरला होता व नागरिकही अंधारात होते. यामुहे त्यांनी लाकडी खांबावर तात्पुरता वीज पुरवठा सुरू केला. ज्या मुख्य वीजतारा जमिनीवर पडल्या, त्या उचलून अथवा कापून सुरक्षित ठेवण्याचे सौजन्य वीज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दाखविले नाही़
ग्रामस्थ कनिष्ठ अभियंता कार्यालयात चकरा मारत आहेत; पण कार्यरत अभियंता पेठे यांचे तुघलकी धोरण व सतत गैरहजर राहण्यामुळे अद्यापही दुरूस्ती झालेली नाही, असा आरोप प्रवीण बेलखेडे, नामदेव अमदरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला़
गावात प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली असता अत्यंत घातक व जीवघेणी अवस्था दिसून आली़ दुसऱ्या खांबावरील वीज पुरवठा भलतीकडेच वळता करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे याबाबत आष्टी येथील कार्यालयात कळविले नाही़ सहायक अभियंता एस.पी. बारई यांना याबाबत विचारणा केली असता अद्याप असला प्रकार माझ्याकडे आला नसल्याचे त्यांनी सांगितले़ एरव्ही वीज कंपनी दुरूस्तीसाठी लाखो रुपयांच्या निविदा काढून निधीची उधळपट्टी करते; पण माणिकनगर येथे गरजू लोकांना मानवी हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचा प्रकार पाहावयास मिळाला़ याकडे वरिष्ठांनी लक्ष देत ग्रामस्थांची धोक्यातून सुटका करणे गरजेचे झाले आहे़