नदीत बुडून सालगड्याचा मृत्यू
By Admin | Updated: March 23, 2015 01:47 IST2015-03-23T01:47:34+5:302015-03-23T01:47:34+5:30
हिंगणी परिसरातील गोहदा शिवारात गुढीपाडव्याच्या दिवशी शेतातील सालगड्याचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला.

नदीत बुडून सालगड्याचा मृत्यू
बोरधरण : हिंगणी परिसरातील गोहदा शिवारात गुढीपाडव्याच्या दिवशी शेतातील सालगड्याचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली असून रविवारी सकाळी उघड झाली. मृतकाचे नाव जयेश शेडमाके असे आहे.
हिंगणी येथील शेतकरी सुरेश करडे यांचा सालगडी जयेश शेडमाके (३०) रा. धामणगाव हा बैल धु्ण्यासाठी बोर नदीच्या काठावर गेला होता. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. बराच वेळ झाला तरी जयेश बैल घेऊन परतला नसल्याने मालक करडे यांनी नदीपात्राकडे जाऊन शोध घेतला. यात त्यांना मृतकाचे कपडे नदीच्या काठावर दिसले. तर बैल बाजुला उभे होते. तेव्हा जयेश संशयास्पदरित्या गायब झाल्याने पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. सायंकाळ झाल्याने अंधारात पाण्यात शोध घेता आला नसल्याने रविवारी सकाळी पाण्यात शोध घेण्यात आला. यावेळी नदीच्या पात्रात असलेल्या चिखलात जयेशचा मृतदेह अडकून असल्याने दिसून आले. सेलू पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)