पूरग्रस्तांना ३० वर्षांपासून भूखंडाची प्रतीक्षा
By Admin | Updated: July 10, 2014 23:46 IST2014-07-10T23:46:32+5:302014-07-10T23:46:32+5:30
येथील वणा नदी लगतच्या जुनी वस्तीतील नागरिकांना नदी पुरापासून दिलासा देण्यासाठी शासनाने ३० वर्षांपूर्वी भुखंडाचे वाटप केले. मात्र या भुखंडाचे कायमस्वरुपी पट्टे देण्यासंबंधी कालबद्ध कार्यक्रम

पूरग्रस्तांना ३० वर्षांपासून भूखंडाची प्रतीक्षा
हिंगणघाट : येथील वणा नदी लगतच्या जुनी वस्तीतील नागरिकांना नदी पुरापासून दिलासा देण्यासाठी शासनाने ३० वर्षांपूर्वी भुखंडाचे वाटप केले. मात्र या भुखंडाचे कायमस्वरुपी पट्टे देण्यासंबंधी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात न आल्याने पुरग्रस्त धारकांना या भुखंडाची विक्री करता येत नाही. यामुळे भुखंडसंबंधी व्यवहारात अडचणी निर्माण होत आहे.
या समस्येतून नागरिकांना दिलासा देत शासनाने कायमस्वरुपी पट्टे देण्याची मागणी होत आहे. याबाबत नुकतेच प्रशासनाला निवेदन दिले असून यावर अंमलबजावणी करण्याची मागणी आहे. वणा नदीच्या पुरामुळे हिंगणघाट शहरातील जुन्या वस्तीतील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत. ही बाब हेरुन शासनाने ही जागा ताब्यात घेवून शहरालगतच्या पिंपळगाव(मा) व नांदगांव (बो.) येथील मौजातील शेतजमिनीवर पुरग्रस्तांचे पुर्नवसन करण्यात आले. त्यावेळी या नागरिकांना शासनाने करारनाम्याची एक प्रत दिली होती.
यानंतर पुरग्रस्त भुखंडधारकांना कायमस्वरुपी पट्टे देण्यात आले नाही. त्यामुळे या भुखंडधारकांना आपल्या मालकीच्या भुखंडाची विक्री करता येत नाही किंवा गहाण ठेवता येत नाही. अशा स्थितीत मुला मुलींचे शिक्षण, लग्न, आजारावरील उपचार यावेळी जमिनीची विक्री करायची असल्यास समस्या निर्माण होते. या प्रश्नावर शासनाने त्वरित निर्णय घेवून कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी गत ३० वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहे.
या मागणीकडे किसान अभियान चे प्रवीण उपासे यांनी आंदोलन करुन स्थानिक व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधुन या प्रकरणाला वाचा फोडली. जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देवुन कालबद्ध कार्यक्रम आखुन २८ जून ते ४ जुलै २०१४ पर्यंत विषयासंबंधित सर्व कागदपत्रे गोळा केली. याआधारे ५ जुलै २०१४ ते २४ जुलै पर्यंत मोका चौकशी व २५ जुलै ते ३० जुलै पर्यंत सदर भुखंडाचा अंतिम अहवाल तयार करुन जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. मौका चौकशी व सर्व्हेक्षण करण्यासाठी दोन पथकाची नेमणुक करण्यात आली असून यात मंडळ अधिकारी तलाठी, भुमापक, न.पा. कर्मचारी यांचा सहभाग आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात या समस्येवर झालेल्या बैठकीत उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, तहसीलदार दीपक करंडे, उपअधीक्षक भुमी अभिलेख उमेश झेंडे, न.प. अभियंता संजय मानकर, किसान अधिकार अभियांनचे उपासे, प्रवीण कटारे, सचिन चरडे, गजानन काटवले, दिलीप ठवरे व नागरिक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)