निम्न वर्धाची पाच दारे उघडली

By Admin | Updated: August 5, 2015 02:06 IST2015-08-05T02:06:27+5:302015-08-05T02:06:27+5:30

जिल्ह्यात सोमवारी दुपारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्रभर सुरू असल्याने आठही तालुक्यात सरासरी २९६.५० मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

Five Wardha's five doors were opened | निम्न वर्धाची पाच दारे उघडली

निम्न वर्धाची पाच दारे उघडली

दमदार पाऊस : बळीराजा सुखावला
वर्धा: जिल्ह्यात सोमवारी दुपारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्रभर सुरू असल्याने आठही तालुक्यात सरासरी २९६.५० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. ही नोंद मंगळवारी सकाळची असून दिवसभर पाऊस सुरूच होता. यामुळे दुपारी ३ वाजताच्या सुमारास निम्न वर्धा धरणाची पाच दारे २२ सेंटीमिटरने उघडण्यात आली. यातून ६२ क्यूसेक पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती आहे.
सोमवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस मंगळवारी दुपारीही सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी कमी उंचीच्या नाल्यावरून पाणी गेल्याने नागरिकांना पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागली. वर्धा शहरातील रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचल्याचे दिसून आले आहे. तर बॅचलर मार्गावरील न्यू आर्टस् महाविद्यालयाजवळही पाणी साचले होते. याचा त्रास या मार्गाने जात असलेल्या नागरिकांना सहन करावा लागला. तर हवालदारपूरा येथील जनार्धन पाटील यांच्या घराशेजारी असलेल्या एका जुन्या इमारतीची भिंत कोसळली. यात कुठलीही प्राणहानी झाली नसली तरी पाटील यांच्या घरात तिचा मलबा पडला आहे.
तळेगाव (श्यामजीपंत) येथील राष्ट्रीय महामार्गावरील पाणी शेतात शिरले. याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागणार असल्याचे दिसत आहे. हमदारपूर मार्गावर असलेल्या कमी उंचीच्या पुलावरून पाणी गेल्याने नागरिकांना पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली. जिल्ह्यातील काही भागात पाणबसण जमिनीत पाणी साचल्याने उभी असलेली पिके पिवळी पडण्याचा धोका उद्भवण्याचे संकेत शेतकऱ्यांनी दिले आहेत.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेला हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असला तरी सर्वाधिक पाऊस वर्धा तालुक्यात पडल्याची नोंद आहे. वर्धा तालुक्यात ५९ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.
गत १५ दिवसांपूर्वी बऱ्याच प्रतीक्षेनंतर पाऊस आला. त्यावेळी आलेला पाऊस मरणासन्न अवस्थेत असलेल्या पिकांकरिता संजीवनी ठरला. त्या काळापासून पाऊस बेपत्ता झाला. तो सोमवारी दुपारपासून बरसला आहे. त्याची धार मंगळवारी सायंकाळपर्यंत सुरूच होती. हा पाऊस असाच सुरू राहिला तर निम्न वर्धा धरणाची आणखी दारे उघडण्याची वेळ येवू शकते असे तेथील अभियंत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सुरू असलेला पाऊस असाच राहिला तर जलसाठ्यांची खालावलेली पातळी लवकरच भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गत २४ तासात जिल्ह्यात एकूण २९६.५० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. सरासरी ३७.०६ मि.मी. एवढा पाऊस झालेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३ हजार ७२०.१५ मि.मी. पाऊस झाला असून सरासरी ४६५.०२ एवढा पाऊस झाला आहे.
२४ तासात वर्धा तालुक्यात सर्वाधिक ५९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात ४६५.०२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
तालुका पाऊस मिमी
वर्धा ५९.००
सेलू११.००
देवळी४४.००
हिंगणघाट२८.३०
समुद्रपूर ४३.००
आर्वी ३५.००
आष्टी५१.४०
कारंजा२४.८०

Web Title: Five Wardha's five doors were opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.