स्वाईन फ्ल्यूचे पाच रूग्ण आढळले
By Admin | Updated: February 13, 2015 00:24 IST2015-02-13T00:24:12+5:302015-02-13T00:24:12+5:30
जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे पाच रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहे. मसाळा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे ...

स्वाईन फ्ल्यूचे पाच रूग्ण आढळले
वर्धा : जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे पाच रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहे. मसाळा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे आजारासंदर्भात जनजागृती मोहीम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होेते. यावेळी जिल्हाधिकारी एन.नवी सोना यांनी आरोग्य व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक सूचना दिल्यात.
या बैठकीत जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मिलिंद सोनवने, जिल्हा आरोग्य अधिकारी डी.जी. चव्हाण, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर उपविभागीय महसूल अधिकारी वैभव नावाडकर उपस्थित होते.
स्वाईन फ्ल्यू संदर्भात जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासोबतच उपाययोजना संदर्भातही जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी आढावा घेताना संशयित रुग्णांचे नमुने त्यांची तपासणी करण्यासाठी आर्वी व हिंगणघाट येथील ग्रामीण रुग्णालयात, जिल्हा सामान्य रुग्णालय, सेवाग्राम रुग्णालय येथे सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले. सोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे विशेष कक्ष सुरू करण्यात आल्याचे सांगितले. सात रुग्णांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. यापैकी दोन रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात व पाच रुग्ण सेवा हॉस्पीटल मध्ये उपचार घेत आहेत.
स्वाईन फ्ल्यू संदर्भात जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासोबतच खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्यांनी या आजाराचे लक्षण आढळल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात कळविणे तसेच रुग्णांची संपूर्ण माहिती व पत्त्याची नोंद घ्यावी, अशा सूचनाही यावेळी केली. शाळेतील विद्यार्थ्यांना ताप अथवा खोकला सातत्याने येत असल्यास पालकांना विश्रांती व औषधोपचार उपचाराबाबत माहिती द्यावी तसेच आजारी असलेल्या विद्यार्थ्यांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मागवू नये, असेही यावेळी सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
स्वाईन फ्ल्यूची लक्षणे
एन्फल्युएझा सदृश्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची उपचारासाठी वर्गवारी करण्यात आली आहे. यात वर्गवारी क मध्ये सौम्य ताप (३८ सेल्सीयस पेक्षा कमी) ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या येणे यावर २४ तासानंतर पूर्नतपासणी करण्यात येत आहे.
वर्गवारी ब मधील रुग्णांमध्ये तीव्र घसादुखी घशाला सूज व ३८ सेल्सीयस पेक्षा जास्त ताप असल्यास रुग्णाच्या तपासणीसाठी नमुना घ्यावा व तत्काळ उपचार सुरू करावेत तसेच अती जोखमीच्या व्यक्तीचे गरोदर माता, उच्च रक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार, कर्करोग, दमा असणाऱ्या व्यक्तीचे स्वॅब घेण्यात यावे.
वर्गवारी अ मधील रुग्णांची अत्यंत काळजी घेणे आवश्यक असून यात इतर लक्षणासह धाप लागणे, छातीत दुखणे, खोखल्या वाटे रक्त पडणे, रक्तदाब कमी होणे, नखे निळसर काळी होणे, मुलांमध्ये चिडचिड आणि झोपाळूपणा येणे ही लक्षण असल्यास प्रत्येक रुग्णांचा स्वॅब घेणे आवश्यक आहे.