पाच रुग्णांनी मिळविला कोरोनावर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST2020-05-30T05:00:00+5:302020-05-30T05:00:36+5:30
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील एक युवती उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल झाली. कोरोना चाचणी केल्यावर ती कोरोना बाधित असल्याचे पुढे आले. त्यानंतर तिच्या निकट संपर्कात आलेल्या तिच्या दोन्ही बहिणी व आईही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आहे. या चारही रुग्णांवर सावंगीच्या रुग्णालयात उपचार सुरू होते.

पाच रुग्णांनी मिळविला कोरोनावर विजय
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कासवगतीने कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असली तरी पाच कोरोना बाधितांनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना शुक्रवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनावर विजय मिळविणाऱ्या या पाच व्यक्तींवर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व इतर कोविड योद्धांनी पुष्प उधळून त्यांना निरोप दिला. सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या दोन तर आर्वी तालुक्यातील जामखुटा येथील तिघांचा समावेश आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील एक युवती उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल झाली. कोरोना चाचणी केल्यावर ती कोरोना बाधित असल्याचे पुढे आले. त्यानंतर तिच्या निकट संपर्कात आलेल्या तिच्या दोन्ही बहिणी व आईही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आहे. या चारही रुग्णांवर सावंगीच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी सुरूवातीला कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या युवतीला वगळता तिच्या आई व एका बहिणीने कोरोनावर विजय मिळविल्याने तसेच त्यांचे सर्व अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने या दोघांना सावंगी (मेघे) रुग्णालयातून शुक्रवारी सुट्टी देण्यात आली आहे. तर नवी मुंबई येथून आर्वी तालुक्यातील जामखुटा येथे आलेल्या एका कुटुंबातील तिघे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात हलविण्यात आले होते. या तीन रुग्णांमध्ये एका अडीच वर्षीय मुलाचाही समावेश असून या तिन्ही कोरोना बाधितांनी कोविड-१९ या विषाणूवर विजय मिळविल्याने त्यांनाही रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व इतर कोविड योद्धांनी कोरोनाला हरविणाºया या तिघांवर पुष्प उधळून त्यांना रुग्णालयातून निरोप दिला.
सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील रुग्णांना निरोप देताना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, सावंगी (मेघे) रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अभ्युदय मेघे, रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आदींची उपस्थिती होती.
त्यांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला प्रमाणपत्र आणि शुभेच्छापत्र देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविले. कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी सावंगी (मेघे) आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील डॉ. संदीप श्रीवास्तव, ललित वाघमारे, चंद्र्रशेखर महाकाळकर, सुनील कुमार, हेमंत देशपांडे, विठ्ठल शिंदे, माधुरी ढोरे आदींनी विशेष प्रयत्न केलेत. असाच निरोप समारंभा सेवाग्राम येथील कस्तूरबा कोविड रुग्णालयातही पार पडला. तेथून आज तीन रुग्णांना निरोप देण्यात आला. यावेळी रुग्णालयाचे अधिकारी उपस्थित होते.
खबरदारीचा उपाय म्हणून सात दिवस रहावे लागणार होम क्वारंटाईन
शुक्रवारी एकूण पाच कोरोना बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून या रुग्णांना पुढील सात दिवस होम क्वारंटाईन रहावे लागणार आहे. या व्यक्तींना समाजातील इतर व्यक्तींसोबत पुढील सात दिवस मिसळता येणार नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी सांगितले.
कोरोनामुक्त म्हणून दिले प्रमाणपत्र
आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या पाचही रुग्णांना कोरोनामुक्त झाले म्हणून एक प्रमाणपत्र देण्यात आले आहे. रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर या पाचही व्यक्तींनी डॉक्टर, नर्स व आरोग्य यंत्रणेतील इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.