पाच मिनिटात तहसीलदारांनी आटोपले स्वच्छता अभियान
By Admin | Updated: November 15, 2014 22:52 IST2014-11-15T22:52:41+5:302014-11-15T22:52:41+5:30
बालकदिनाचे औचित्य साधून सकाळी अकराच्या दरम्यान तहसीलदार पुष्पलता कुमरे, समुद्रपूर ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र झाडे, नायब तहसीलदार बी. एन. तिनघसे व काही ग्रामपंचायत सदस्य,

पाच मिनिटात तहसीलदारांनी आटोपले स्वच्छता अभियान
समुद्रपूर : बालकदिनाचे औचित्य साधून सकाळी अकराच्या दरम्यान तहसीलदार पुष्पलता कुमरे, समुद्रपूर ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र झाडे, नायब तहसीलदार बी. एन. तिनघसे व काही ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व तहसील कार्यालयाचे कर्मचारी हा सर्व ताफा समुद्रपूर येथील उच्च प्राथमिक शाळा व बालवाडी येथे स्वच्छता अभियानाकरिता पोहोचला. तहसीलदार कुमरे यांनी हातात खराटा घेऊन छायाचित्रे काढण्यापुरती झाडलोट केली. पाचच मिनिटात त्यांचे स्वच्छता अभियान आटोपले. त्यामुळे सर्वत्र चर्चा रंगायला सुरुवात झाली आहेच पण तहसील कार्यालताच्या आवारातच कचरा असल्याने आधी कार्यालय परिसराची स्वच्छता करावी अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
तहसीलदारांना सभेला जायचे असल्याचे कारण सांगत त्या तातडीने निघून गेल्या. पाठोपाठ तहसील कार्यालयाचे कर्मचारीही पाच मिनिटाच्या फरकाने रफादफा झाले. वरिष्ठांचे लेखी आदेश आल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांवर अनिच्छेने तसेच छायाचित्रे काढून वृत्तपत्रामध्ये चमकोगिरी करण्यासाठीच स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याचे समान्यांमधून बोलले जात आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षरित्या तहसीलदार पुष्पलता कुमरे काम करतात त्या तहसील कार्यालयाच्या परिसरातच कचऱ्याचे ढीग व हागणदारी पसरलेली दिसते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वत:च्या कार्यालयापासून परिसर स्वच्छ करून नंतरच गावातील सफाईसाठी येऊन नागरिकांना योग्य संदेश द्यावा असे बोलल्या जात आहे.
प्राथमिक शाळा व बालवाडी गेल्या कित्येक वर्षापासून कचऱ्याच्या ढिगाने व हागणदारीने त्रस्त आहेत. दहेगाव मार्गावरील मुक्ताबाई विद्यालयात जाताना विद्यार्थ्यांना नाकाला रूमाल बांधूनच जावे लागते. रेणुकापूर ते समुद्रपूर मार्गावर दीड किलोमिटर अंतरामध्ये हागणदारी पसरली आहे. पहाटे फिरायला जाणाऱ्यांना या हागणदारीमुळे कोठलाच रस्ता सोडलेला नाही. याबाबत प्रशासनाने स्वच्छतेचा निव्वळ देखावा न करता कडक निर्बंध लादून वेळप्रसंगी पोलीस प्रशासनाची मदत घेवून गांभीर्याने या बाबींवर लक्ष देण्याची गरज आहे. परंतु केवळ फोटो काढण्यापुरते सफाई अभियान राबविले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.(तालुका प्रतिनिधी)