हिवाळी अधिवेशनात शहीद स्मारकासाठी पाच कोटी
By Admin | Updated: August 21, 2015 02:24 IST2015-08-21T02:24:06+5:302015-08-21T02:24:06+5:30
येथील शहीद स्मृतिदिन हा संकल्प दिन म्हणून साजरा करावा. १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ज्या नररत्नांनी प्राणांची आहुती दिली ...

हिवाळी अधिवेशनात शहीद स्मारकासाठी पाच कोटी
सुधीर मुनगंटीवार : आष्टीच्या विकासासाठी सदैव तत्पर
आष्टी (शहीद): येथील शहीद स्मृतिदिन हा संकल्प दिन म्हणून साजरा करावा. १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ज्या नररत्नांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्या स्मृतीचे कायम जतन व्हावे, या दृष्टीने आष्टीच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही देतानाच येत्या हिवाळी अधिवेशनात आष्टी येथील स्मारकासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी समितीने प्रस्ताव सादर करावा, असे प्रतिपादन वित्त व नियोजनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी आष्टी येथे केले.
आष्टीच्या हुतात्मा विद्यालयात आयोजित शहीद स्मारक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, माजी आमदार दादाराव केचे, डॉ. शिरीष गोडे, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष राजाभाऊ अवसक, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, पंचायत समिती सभापती रहाटे, अप्पर जिल्हा पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, हुतात्मा स्मारक समितीचे अरविंद मालपे, सप्त खंजेरी वादक भाऊसाहेब थुटे, सुरेश खैरनाथ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भास्कर ठाकरे हे होते.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हजारो शहीदांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्याने तिरंगा ध्वजाचा अधिकार आम्हाला प्राप्त झाला. येथील स्वातंत्र्य विरांच्या या भूमित देशासाठी बलशाली देशभक्त निर्माण व्हावे, तरूणांनी स्वातंत्र्यासाठी बलीदान करणाऱ्या विरांचे कायम स्मरण करून देशभक्तीची प्रेरणा घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मी राधाबाई बोलते
आष्टी येथील विद्यार्थीनी श्रावण नाकतोडे हिने ‘मी राधाबाई बोलतेय’ ही नाटीका सादर केली. नाटीकेतून श्रावणीने शहीदांचा इतिहास उपस्थितांच्या डोळ्यासमोर उभा केला. ‘आष्टी विरगाथा’ ही माहितीपट पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जनतेला अर्पण करण्यात आला. यावेळी या चित्रपटाच्या माध्यमातून शहीदांच्या आठवणींना उजाळा दिला.
आष्टीच्या शहीद स्मारकासाठी समितीने प्रकल्प अहवाल तयार करून जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना सादर करावा. येत्या हिवाळी अधिवेशनात स्मारकासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात येतील.