एकाच रात्री पाच घरफोड्या
By Admin | Updated: August 12, 2016 01:36 IST2016-08-12T01:36:24+5:302016-08-12T01:36:24+5:30
संपूर्ण शहर झोपेत असताना गुरुवारी पहाटेच्या सुमारास शहरातील गांधी नगर, हरिराम नगर, टिळक नगर भागात चोरट्यांनी पाच कुलूपबंध घराचे कुलूप तोडून

एकाच रात्री पाच घरफोड्या
पुलगावात चोरांची दहशत : दोन दुचाकी व मोबाईलसह लाखांचा ऐवज लंपास
पुलगाव : संपूर्ण शहर झोपेत असताना गुरुवारी पहाटेच्या सुमारास शहरातील गांधी नगर, हरिराम नगर, टिळक नगर भागात चोरट्यांनी पाच कुलूपबंध घराचे कुलूप तोडून रोख, सोने, चांदीचे दागिने दोन दुचाकी व दोन मोबाईल असा एकूण दोन लाखांचा ऐवज लंपास केला. या सहाही ठिकाणी सारख्याच पद्धतीने चोरी केल्याचे दिसून आले. या चोरींची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चोरीचा तपास करण्याकरिता वर्धा येथून शोध व ठसे तज्ज्ञांची चमू व श्वानपथक दाखल झाले.
गांधी नगरातील विनोद खेडकर हे घराला कुलूप लावून परिसरातील त्यांच्या मोठ्या भावाकडे झोपायला गेले होते. ते सकाळी घरी आले असता घराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी घरात पाहणी केली असता कपाटातील कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे घरातून ८ ते १० ग्रॅम सोन्याची साखळी व ३ हजार ५०० रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले. याच भागातील निरूपमा यादव या हिंगणघाट येथे नोकरी करतात. त्यांच्या घरालाही कुलूप होते. त्यांच्या घराचेही कूलूप तोडल्याचे सकाळी दिसून आले; पण चोरट्यांनी त्यांच्या घरातून काय लंपास केले हे कळू शकले नाही. सचिन कोंबे यांनी घरासमोर ठेवलेली एमएच ३२ के ६७५६ क्रमांकाची दुचाकीही या चोरट्यांनी लंपास केली.
हरिराम नगर परिसरातील अशोक चावके हे वरच्या मजल्यावर झोपलेले असताना चोरट्यांनी खालच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले व कपाटातील १४ हजाराचे चांदीचे भांडे तसेच १५ हजार रुपये रोख दोन मोबाईल असा एकूण २५ हजार रुपये व अंगणात ठेवलेली ६२ हजार रुपये किंमतीची एम.एच.३२/५०५२ क्रमांकाची दुचाकी लंपास केल्याचे चावके यांनी सांगितले. टिळक नगरात जाधव यांच्या शेजारी राहणाऱ्या एका घराचे कुलूप चोरट्यांनी तोडले. घरात राहणाऱ्या मुली बाहेरगावी गेल्यामुळे येथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली. या चोरीचा तपास लावण्यासाठी ठसे तज्ज्ञ व शोध पथक, श्वान पथक शहरात दाखल झाले आहे. एकाच रात्री घडलेल्या या चोऱ्यांमुळे शहरात भीती निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त सुरू करावी अशी नागरिकांची ओरड आहे.(तालुका प्रतिनिधी)