संचालकासह पाच जणांवर गुन्हा; कारवाई शून्यच
By Admin | Updated: February 21, 2017 01:09 IST2017-02-21T01:09:31+5:302017-02-21T01:09:31+5:30
स्थानिक औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रिजमध्ये एका कामगाराच्या मृत्यू झाला होता.

संचालकासह पाच जणांवर गुन्हा; कारवाई शून्यच
महालक्ष्मी कंपनी प्रकरण : देवळी पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
देवळी : स्थानिक औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रिजमध्ये एका कामगाराच्या मृत्यू झाला होता. या प्रकरणी देवळी पोलिसांनी उशिरा का होईना संचालकासह पाच व्यक्तीविरुद्ध शनिवारी देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून तीन दिवसांचा कालावधी झाला तरी कारवाईच्या नावावर येथे काहीच झाले नाही. या प्रकरणात कारवाई करण्याकरिता पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. असे असले तरी होणाऱ्या कारवाईकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
देवळी औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रिजमध्ये मध्य प्रदेशातील राठी येथील सुनील कोका कुंभरे (२५) हा कामगार कार्यरत होता. दरम्यान ३१ डिसेंबर २०१६ रोजी कंपनीत त्याचा अपघात झाला. या घटनेची तक्रार देवळी ठाण्यात न करता जखमी सुनील कुंभरे याला नागपुरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान ३ जानेवारीला त्याचा मृत्यू झाला. कंपनी व्यवस्थापनाने नागपुरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करुन हे प्रकरण पुढील तपासाकरिता ५ जानेवारीला देवळी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. पण, कुणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता. या कंपनीत नेहमी अपघात होऊनही गुन्हे दाखल झाले नव्हते.
कामगार संघटनांच्या दबावामुळे कारवाई
देवळी : कंपनीत जखमी झालेल्या सुनील कुंभरे मृत्यूप्रकरणही विस्मरणात जाणार काय, असा सवाल कामगार संघटनांनी उपस्थित केला. कामगार व संघटनांचा दबाव वाढू लागल्याने ठाणेदार चंद्रकांत मदणे यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले. लगेच चौकशीला गती देत शनिवारी रात्री पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रीजचे संचालक योगेश मंदानी, व्यवस्थापक प्रजावीर आचार्य, कंत्राटदार महेंद्र रॉय, अग्निशमन अधिकारी प्रसाद अनिल कुकेकर, पाळीप्रमुख महावीर शिवलाल पुच्छकर आदींचा समावेश आहे. कामगार मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे लक्षात येताच सहायक फौजदार युवराज बाभळे यांनी फिर्याद नोंदविली होती.(प्रतिनिधी)
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रीजने प्रदुषणाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. कंपनीत नेहमीच अपघात होतात. मात्र ही प्रकरणे बाहेर येऊ दिले जात नाही. कामगाराचा अपघात झाल्यानंतर गुप्तरित्या नागपूरातील खासगी रुग्णालयात भरती केले जाते. वाच्यात केल्यास नोकरीतून काढण्याची धमकी मिळते. अशीही कामगारांमध्ये दबक्या सुरात चर्चा आहे.
सहा कामगारांची कधी होणार चौकशी?
२ फेब्रुवारी २०१७ ला सहा कामगार जखमी झाले होते. त्यांना तातडीने नागपूरात उपचार करुन प्रकरण गुंडाळण्यात आले. व्यवस्थापनाने या घटनेची तक्रार अद्याप देवळी ठाण्यात केली नाही. मागील एक वर्षात अशी अनेक प्रकरणे दडपण्यात आले, असा आरोप कामगार संघटनांनी केला. यासंदर्भात ठाणेदार मदणे यांना विचारल्यानंतर म्हणाले, अपघातग्रस्त सहा कामगारांची चौकशी सुरू केली. सर्व पुरावे हाती आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल.