आमगावात बसविण्यात आला पहिला सौर कृषी पंप
By Admin | Updated: May 26, 2016 00:59 IST2016-05-26T00:27:06+5:302016-05-26T00:59:46+5:30
शेतीला शाश्वत व निरंतर सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासोबतच शेतीला शेतकऱ्यांना बारमाही पीक घेण्यासाठी सौर कृषी पंप योजना उपयुक्त ठरली आहे.

आमगावात बसविण्यात आला पहिला सौर कृषी पंप
११ पंपांद्वारे सिंचन : जिल्हाधिकाऱ्यांद्वारे हमदापूर, देऊळगावची पाहणी
वर्धा : शेतीला शाश्वत व निरंतर सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासोबतच शेतीला शेतकऱ्यांना बारमाही पीक घेण्यासाठी सौर कृषी पंप योजना उपयुक्त ठरली आहे. या योजनेतील पहिला सौर कृषी पंप आमगाव येथील हेमंत मोहरील या शेतकऱ्याकडे लावण्यात आला आहे. सदर सौर कृषी पंप यशस्वीपणे कार्यान्वित झाला आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त या जिल्ह्यासाठी शासनाने सौर कृषी पंप योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सौर कृषी पंपाच्या एकूण किमतीच्या केवळ पाच टक्के रक्कम भरल्यानंतर लाभार्थ्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यात येत आहे. या योजनेमुळे विद्युत जोडणीपासून वंचित राहणाऱ्या बऱ्याच एकरापर्यंत शेती असलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजने सहभागी होऊन बारमाही पिके घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
सौर कृषीपंप योजनेंतर्गत जिल्ह्यात ११ सौर कृषभ पंप बसविण्यात आले असून आठवड्यात २८ पंप बसविण्याचे नियोजन आहे. जिल्ह्याला ९२० सौर कृषी पंपपचे उद्दिष्ट आहे. १७६ सौर कृषी पंपांना पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आता निसर्गावर अवलंबून न राहता आपल्या शेतात पारंपरिक पिकांऐवजी रोख भाजीपाला, फळाची शेती करून आर्थिक विवंचनेतून बाहेर पडावे. विजेची जोडणी मिळण्यास पात्र नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्यासने लाभ मिळत असून सौर कृषभ पंपांमुळे विजेच्या बिलापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळत आहे. शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेऊन भाजीपाला व फळबागासारखे बारमाही पिके घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी नवाल यांनी केली आहे.
सेलू तालुक्यातील हमदापूर येथे सुधाकर मारोतराव डोणे, देऊळगावच्या भीमराव निंदे या शेतकऱ्यांच्या शेतात बसविण्यात आलेल्या सौर कृषी पंपांची पाहणी करीत जिल्हाधिकारी नवाल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. हमदापूरच्या सुधाकर डोणे यांच्याकडे तीन एकर शेती असून शेतात विहिरीला पाणी आहे. केवळ वीज जोडणी नसल्याने सिंचन करणे शक्य नव्हते. सौर उर्जा कृषी पंपामुळे केवळ १६ हजार २०० रुपये भरून ३ लाख २४ हजार रुपयांच्या तीन एचपीचा पंप व सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात आले. सौर कृषी पंपामुळे आता बारमाही पिके घेणे सुलभ होणार आहे. प्रत्येक महिन्याला विजेचे देयक भरावे लागणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात बसविलेल्या ११ सौर कृषी पंपाची यशस्वी चाचणी झाली आहे. सौर ऊर्जेमुळे शाश्वत व निरंतर सिंचनाचा लाभ मिळणार असल्याने पारंपरिक ऊर्जास्त्राताऐवजी अपारंपरिक नवीन उर्जास्त्रोताचा वापर शेतीसाठी फायदेशीर ठरणार आहे.
शेतकऱ्यांनी सौर उर्जेचा वापर वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण सहकार्य केले जाणार आहे. सातबारावर कुटुंबातील व्यक्तीच्या एकत्र असलेल्या नोंदीऐवजी हिस्से-वाटणीनुसार सातबारा उपलब्ध करून देण्यात येतील. अधिकाधिक शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले.
प्रारंभी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांनी सौर कृषी पंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा सहभाग वाढत असून प्रत्यक्ष सौर पंप सुरू झाल्यानंतर इतर शेतकऱ्यांना याची उपयुक्तता माहिती होत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी पाच टक्के सहभाग द्यावा, असे आवाहन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी स्मीता पाटील, भागवत कुंभार, उपकार्यकारी अभियंता सुहास पडोळे, चंदन गावंडे, मिलिंद माने आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून रोख पिके घेण्याचे आवाहन केले.(कार्यालय प्रतिनिधी)