तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आग
By Admin | Updated: October 26, 2014 22:43 IST2014-10-26T22:43:51+5:302014-10-26T22:43:51+5:30
येथील सेवाग्राम मार्गावर असलेल्या तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीला शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत महाविद्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे खाक झाली.

तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आग
आगीचे कारण गुलदस्त्यात : स्टोअर रूममधील शैक्षणिक दस्तऐवज खाक
वर्धा : येथील सेवाग्राम मार्गावर असलेल्या तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीला शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत महाविद्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे खाक झाली. आग वाचनालयापर्यंत पोहोचली मात्र यात पुस्तके बचावली तरी महाविद्यालयाचे मोठे नुकसान झाले. आग लागण्याचे नेमके कारण मात्र कळू शकले नसले तरी दिवाळीच्या फटाक्यांमुळे ही आग लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
निश्चय बहुउद्देशिय ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध अभ्यासक्रम सुरू आहेत. सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने महाविद्यालयात कुणीच जात येत नाही. शिवाय महाविद्यालयातील ज्या खोलीत आग लागली त्या खोलीत विजेचा दिवाही नसल्याचे महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाने सांगितले आहे. येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती असलेले विविध कागदपत्र व महाविद्यालयातील काही महत्त्वाची कागदपत्रे होती. या खोलीतूनच आग पसरली असल्याचे सांगण्यात आले आहे. येथून आग वाचनालयापर्यंत पोहोचली. या आगित वाचनालयातील पुस्तके मात्र बचावलीत.
आग लागल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना देत पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठत वेळीच आग आटोक्यात आणली. यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप तलमले व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी या प्रकरणी शहर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र कशाने आग लागली याबाबत कुठलाही खुलासा करण्यात आला नाही. (प्रतिनिधी)