कपाटात ठेवलेले फटाके फुटून घराला आग
By Admin | Updated: October 21, 2016 01:58 IST2016-10-21T01:58:49+5:302016-10-21T01:58:49+5:30
कपाटात असलेले फटाके फुटल्याने घराला आग लागल्याची घटना कारला मार्गावरील लक्ष्मी अपार्टमेंट येथील वामनपल्लीवार यांच्या घरी

कपाटात ठेवलेले फटाके फुटून घराला आग
कारला मार्गावरील घटना : घरी कोणी नसल्याने अनर्थ टळला
वर्धा : कपाटात असलेले फटाके फुटल्याने घराला आग लागल्याची घटना कारला मार्गावरील लक्ष्मी अपार्टमेंट येथील वामनपल्लीवार यांच्या घरी गुरुवारी दुपारी घडली. यावेळी घरात कोणी नसल्याने अनर्थ टळला. ऐन दिवाळीच्या तोंडावर फटाक्यामुळे लागलेल्या आगीमुळै सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत फटाक्यासंदर्भातील नियम कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कारला मार्गावरील लक्ष्मी अपार्टमेंटमध्ये संजय वामनपल्लीवार यांचे घर आहे. आज दुपारी त्यांच्या घरातील खिडकीतून नागरिकांना धुराळे लोळ उठल्याचे दिसून आले. यामुळे परिसरातील नागरिकांनी वामनपल्लीवार यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र त्यांच्या घराला कलूप होते. आग आटोक्यात आणण्याकरिता नागरिकांनी प्रयत्न केले. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. मात्र अग्निधमन दल तब्बल दीड तास उशिराने पोहोचले. तोपर्यंत परिसरतील नागरिकांनी आगीवर ताबा मिळविला होता. आगीच्या कारणाचा शोध घेतला ही आग कपाटात असलेले फटाके फुटल्याने लागल्याचे समोर आले. आग विझविण्याकरिता परिसरातील युवकांनी परीश्रम घेतले. यात आशिष मोहोड, मनोज गिरी व बादल खडेझोड यांचा समावेश आहे. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी केली असून तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)
दिवाळीच्या तोंडावर सुरक्षा ऐरणीवर
दिवाळीत जिल्ह्यात अनेकांकडून फटाके विक्रीचा व्यवसाय करण्यात येतो. यातील काहींकडे परवाना असतो तर काहींकडे तो नसतो. फटक्याची विक्री करणाऱ्यांना त्याचा साठा करताना काही नियम दिलेले आहे. वर्धेत त्याचे पालन होते अथवा नाही याची शाश्वती नाही. याचाच प्रत्यय वर्धेत घडलेल्या आगीच्या घटनेने आला. वामनपल्लीवार यांच्या घरी कोणीच नसताना ही घटना घडली. यावेळी घरी कोणी नसल्याने अनर्थ टळला. यामुळे जिल्हा प्रशासनाने फटाक्यांचा साठा ठेवणाऱ्यांना तशा सूचना करण्याची गरज निर्माण झाली आहे.