सीएडी कॅम्पमधील आग आटोक्यात

By Admin | Updated: June 1, 2016 02:36 IST2016-06-01T02:36:36+5:302016-06-01T02:36:36+5:30

पुलगाव येथील मध्यवर्ती दारूगोळा भंडारमध्ये (सीएडी कॅम्पमध्ये) सोमवारी मध्यरात्री लागलेली आग आटोक्यात आली आहे.

A fire accident in CAD camp | सीएडी कॅम्पमधील आग आटोक्यात

सीएडी कॅम्पमधील आग आटोक्यात

पाच गावातील नागरिकांना हलविले : प्रशासनाकडून उपाययोजना सुरू
वर्धा : पुलगाव येथील मध्यवर्ती दारूगोळा भंडारमध्ये (सीएडी कॅम्पमध्ये) सोमवारी मध्यरात्री लागलेली आग आटोक्यात आली आहे. आगीमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आजूबाजूच्या पाच गावातील नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने अन्य ठिकाणी हलविण्यात आले आहे. स्फोट व त्यानंतर लागलेल्या आगीची माहिती कळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्यावतीने तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्याने ही आग आटोक्यात आली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल सकाळी पाच वाजतापासून घटनास्थळावर उपस्थित होते.
घटनेची माहिती देवळी तहसीलदारांकडून प्राप्त होताच आग आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यासह नागपूर व यवतमाळचे अग्निशामक वाहने तातडीने उपलब्ध करून देण्यात आली. कॅम्पमधील सेना अधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे प्रशासनाच्यावतीने पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिका व अग्निशामक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी स्वत: जिल्हा शल्य चिकित्सक, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) व महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम यांच्याशी संपर्क साधून पुरेशाप्रमाणात रुग्णवाहिका व प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. स्फोट व त्यानंतर लागलेल्या आगीमुळे आजुबाजूच्या पाच गावातील नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने मुरदगाव, आगरगाव, यसगाव, नागझरी व पिंपरी या पाच गावातील नागरिकांना सुरक्षेदृष्टीने देवळी येथील नगर परिषद शाळा व डिगडोह येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हलविण्यात आले. नागरी वस्तीमध्ये सदर स्फोट व आगीमुळे कोणत्याही प्रकारची हाणी झाली नाही. सदर विस्थापिकांच्या कॅम्पलाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ होत असल्याचे दिसून आले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: A fire accident in CAD camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.