बड्या व्यावसायिकांकडून छोट्यांवर ‘जुर्माना’

By Admin | Updated: November 4, 2015 02:22 IST2015-11-04T02:22:25+5:302015-11-04T02:22:25+5:30

बाजार परिसरात एकाद्या मोठ्या दुकानासमोर हातबंडी लावून व्यवसाय करावयाचा असेल तर या छोट्या व्यवसायिकाला

'Fine' on smallpans by big businessmen | बड्या व्यावसायिकांकडून छोट्यांवर ‘जुर्माना’

बड्या व्यावसायिकांकडून छोट्यांवर ‘जुर्माना’

वर्धा : बाजार परिसरात एकाद्या मोठ्या दुकानासमोर हातबंडी लावून व्यवसाय करावयाचा असेल तर या छोट्या व्यवसायिकाला त्या दुकान मालकाला भाडे द्यावे लागत आहे. एका दिवसापोटी एक हजार रुपये किंवा झालेल्या व्यवसायाच्या काही टक्के रक्कम त्याला द्यावी लागते. पालिकेच्या जागेवर होत असलेल्या या सुल्तानी वसुलीची माहिती मिळताच पालिकेचे अधिकारीही अवाक् झाले.
हा प्रकार पालिकेच्यावतीने मंगळवारी राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेतही उघड झाला. कधी मोठ्या शहरात घडत असलेला प्रकार वर्धेतही सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शेजारी दुकानादारही त्याच्या बाजुला असलेल्या दुकानदाराकडून न.प.च्या रिकाम्या जागेचे भाडे वसुल करीत असल्याचे समोर आले आहे. दररोज तसेच व्यवसायाच्या टक्क्यावर ही वसुली होत असल्याचे समजते. पालिकेच्या जागेवर होत असलेल्या या व्यवसायाची मात्र पालिकेला कानोकानही खबर नसल्याचे आज समोर आले आहे. रस्त्यावर दुकान थाटण्याकरिताही मोठ्या व्यावसायिकाला पैसे मोजावे लागत असल्याची धक्कादायक बाब पुढे येताच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोंडात बोट घातले.
सध्या दिवाळी सणाकरिता बाजारपेठ फुलली आहे. आपलाही व्यवसाय व्हावा, या हेतूने छोटे व्यावसायिक हातगाडीवर दुकान थाटून रस्त्याच्या लगत उभे राहतात. मोठ्या दुकानासमोर या हातगाड्या उभ्या केल्यामुळे आपल्या ग्राहकांना ये-जासाठी अडचण होईल ही सबब पुढे करुन मोठ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून त्या जागेचे भाडे वसुली सुरू आहे. या अतिक्रमणामुळे रस्ते मात्र अरुंद झाले. येथे होणारी वाहतुकीची कोंडी नगर पालिकेसाठी डोकेदुखी ठरली. वर्धा पालिकेने आज अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. कपडा लाईन, मुख्य मार्केट, पत्रावळी चौक, निर्मलबेकरी रोड या मार्गावर दुकानाबाहेर साहित्य ठेवून व्यवसाय करणाऱ्या दुकान मालकांवर कारवाई करण्यात आली. काहींकडून साहित्य जप्त करण्यात आले तर काहींना दंड ठोठावला. मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी वाघमळे, अभियंता सुधीर फरसोले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तातही ही कारवाई केली.

पहिल्या दिवशी २५ हजारांचा दंड वसूल
४नगर परिषदेच्यावतीने मंगळवारी राबविण्यात आलेल्य या मोहिमेत दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवत व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. काहींचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यांना दंड आकारण्यात आला. या करवाईत एकूण २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मोहीम उद्याही राबविणार
४शहरात राबविण्यात येत असलेली ही मोहीम केवळ आजच नाही तर उद्याही राबविण्यात येणार आहे. आज ज्यांना ताकीद दिली त्यांनी जर पुन्हा तसेच साहित्य रस्त्यावर ठेवले तर त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. बुधवारी सकाळी १० वाजतापासून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यात बाजार परिसरातील आजच्या कारवाईतील परिसरासह उर्वरीत ठिकाणीही ही कारवाई करण्यात येणार आहे.

दोन ट्रक रेती जप्त
४पालिकेच्यावतीने राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत रस्त्यावर असलेली दोन ट्रक रेती पालिकेच्यावतीने जप्त करण्यात आली. ही रेती पालिकेच्या परिसरात ठेवण्यात आली आहे.
४रस्त्यावर शेड काढून त्यात साहित्य ठेवणाऱ्या दुकानमालकांचे शेड काढण्यात आले. तर बाजार परिसरात ही कारवाई करताना एका व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई सुरू असताना त्याचा मुख्याधिकारी वाघमळे यांच्याशी वाद झाला. यात अखेर त्याला दंड न करता पालिकेने काढता पाय घेतला.


पालिकेच्यावतीने राबविण्यात आलेली ही कारवाई रस्त्यावर साहित्य ठेवत अतिक्रमण करणाऱ्यांवर होती. यात छोट्या व्यावसायिकांना त्रास देण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता. ही मोहीम बुधवारीही राबविण्यात येणार आहे. यात अतिक्रमण करणाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आता त्यांना पालिकेच्यावतीने थेट दंड आकारण्यात येत आहे. यात जेवढे मोठे अतिक्रमण तेवढा मोठा दंड, असे चित्र राहणार आहे.
- सुधीर फरसोले, नगर अभियंता, नगर परिषद,वर्धा.

Web Title: 'Fine' on smallpans by big businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.