मेहनत व परिश्रमातून यशाचा मार्ग सापडतो

By Admin | Updated: December 30, 2015 02:40 IST2015-12-30T02:40:17+5:302015-12-30T02:40:17+5:30

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशाचा मार्ग निवडताना मेहनत व परिश्रमाची जोड दिली तरच आपण यशस्वी होऊ शकतो, ...

Finding the way to success is through hard work and hard work | मेहनत व परिश्रमातून यशाचा मार्ग सापडतो

मेहनत व परिश्रमातून यशाचा मार्ग सापडतो

सुधीर मुनगंटीवार : वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जिल्हा ग्रंथालयाकरिता १.७० कोटी मंजूर
वर्धा: स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशाचा मार्ग निवडताना मेहनत व परिश्रमाची जोड दिली तरच आपण यशस्वी होऊ शकतो, असा सल्ला राज्याचे अर्थ व नियोजन तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
वर्धा येथील जिल्हा शासकीय ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी जिल्हा नियोजन समितीच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये १ कोटी ७० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बिरसा मुंडा फाऊंडेशन यांच्यातर्फे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर व जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचेही आभार फाऊंडेशनने व्यक्त केले.
विश्रामगृहाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, लोकसंख्येच्या प्रमाणात विदर्भ व मराठवाड्यातील तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत नसल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीच्या माध्यमातून विदर्भ मराठवाड्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या नोकऱ्यामध्ये या भागातील भरती होते किंवा काय या संदर्भात सखोल अभ्यास करण्यात आला. या संदर्भातील शासन निर्णय लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. विदर्भ व मराठवाड्यातील तरुणांनी प्रशासकीय सेवेत भरती, निवड होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. शासनातर्फे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील; परंतु विद्यार्थ्यांनी परिश्रम व चिकाटीने यशाचा मार्ग मिळवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मिळालेल्या निधीतून ग्रंथालयात सुसज्ज अशी अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावेळी आमदार समीर कुणावार, जि.प.सभापती मिलिंद भेंडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Finding the way to success is through hard work and hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.