पावसाच्या सरासरीची माहिती इंटरनेटवर शोधा
By Admin | Updated: November 25, 2014 23:00 IST2014-11-25T23:00:34+5:302014-11-25T23:00:34+5:30
हवामानावर आधारित पीक विमा काढलेल्या शेतकऱ्याने या हंगामात किती पाऊस झाला, याबाबत कृषी विभागात विचारणा केली़ यावर सदर शेतकऱ्यास इंटरनेटवर शोधा, असे उत्तर देण्यात आले़

पावसाच्या सरासरीची माहिती इंटरनेटवर शोधा
विरूळ (आ़) : हवामानावर आधारित पीक विमा काढलेल्या शेतकऱ्याने या हंगामात किती पाऊस झाला, याबाबत कृषी विभागात विचारणा केली़ यावर सदर शेतकऱ्यास इंटरनेटवर शोधा, असे उत्तर देण्यात आले़ या प्रकारामुळे शेतकरी अवाक झाला़ कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना सहकार्य मिळत नसून योजनांची पूरेपूर माहिती दिली जात नसल्याचा आरोप सदर शेतकऱ्याने केला आहे़
शेतकऱ्याच्या पिकांना निसर्गाच्या लहरीपणामुळे फटका बसू नये, शेतमालाचे उत्पादन न झाल्यास किमान विम्याच्या माध्यमातून भरपाई तरी मिळावी म्हणून हवामान आधारित पीक विमा योजना राबविली जात आहे़ या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे़ शासनस्तरावर योजनेत सहभाग वाढावा म्हणून मुदतवाढही दिली जात आहे; पण कृषी विभागातून योजनेशी संबंधित माहिती मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ याचा अनुभव धामणगाव (वाठोडा) येथील प्रवीण ठाकरे नामक शेतकऱ्याला आला आहे़ सदर शेतकऱ्याने जिल्ह्यात हवामान आधारित पीक विमा योजना सुरू होताच विम्याची रक्कम अदा करून सहभाग घेतला़ ठाकरे यांच्याकडे चार खाते धारकांची वायफड शिवारात एकूण २१ एकर जमीन आहे़ त्यांनी यावर्षी कापसाची पेरणी केली़ २१ एकरातील पिकाचा हवामान आधारित विमाही काढला़ यासाठी त्यांनी हप्त्याची १३ हजार ५०० रुपयांची रक्कमही अदा केली़ सदर पावतीही त्यांनी जपून ठेवली़
या हंगामात अनियमित पाऊस झाला़ कधी अतिवृष्टी तर कधी पावसाने दडी मारली़ यात शेतातील कपाशीच्या पिकाची वाट लागली़ यामुळे त्यांनी हवामान आधारित पीक विम्याचा लाभ मिळावा म्हणून हक्क सांगितला; पण यासाठी त्यांना कधी किती पाऊस झाला, अतिवृष्टी कधी झाली व पावसाने दडी कोणत्या काळात मारली, याची माहिती हवी होती़ यामुळे त्यांनी कृषी विभागाकडे सदर माहिती मागितली; पण जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने त्यांना पावसाची इंटरनेटवर माहिती शोधा, असे लेखी पत्रच देऊन टाकले़ या प्रकारामुळे ठाकरे यांना धक्काच बसला़ कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने पावसाच्या आकडेवारीची प्रत काढली; पण ती प्रत देऊ नका, असा आदेश असल्याचे सांगण्यात आले़ यामुळे शेतकऱ्याची गोची झाली़ या प्रकरणाची सखोल चौकशी करून पावसाच्या अनियमिततेबाबत माहिती मिळावी व पीक विम्याची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी प्रवीण ठाकरे यांनी निवेदनातून केली आहे़(वार्ताहर)