ग्रामिणांच्या गळ्याभोवती आवळतोय फायनान्सचा फास
By Admin | Updated: November 27, 2015 02:25 IST2015-11-27T02:25:08+5:302015-11-27T02:25:08+5:30
शासकीय बचत गटापेक्षा कमी कागदपत्रांमध्ये त्वरित कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या फायनान्स कंपन्या सध्या सक्रीय झाल्या आहेत.

ग्रामिणांच्या गळ्याभोवती आवळतोय फायनान्सचा फास
गावांमध्ये वाढतोय व्याप : चक्रवाढ व्याज घेतेय गरिबांचा जीव
तळेगाव (श्या.पं.) : शासकीय बचत गटापेक्षा कमी कागदपत्रांमध्ये त्वरित कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या फायनान्स कंपन्या सध्या सक्रीय झाल्या आहेत. यात गत पाच वर्षांत तालुक्यातील चार जणांचा बळी गेला आहे. ४० गावे या फायनान्सच्या विळख्यात अडकली असून चक्रवाढ व्याजामुळे गरिबांचे जीव जात माहिती पुढे आली आहे.
तालुक्यातील महिला बचत गटांना विविध बँकांद्वारे प्रशासकीय अधिकारी कर्ज वितरित करतात; पण हे कर्ज मंजूर होण्यास अवधी लागतो. यामुळे अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात अनेक फायनान्स कंपन्यांनी डोके वर काढले आहे. १० ते २० महिलांचा बचत गट तयार केल्यानंतर संबंधित कंपनी त्यांना कर्ज उपलब्ध करून देते. प्रत्येक आठवड्याला बाजाराच्या दुसऱ्या दिवशी वसुली केली जाते. सर्व महिलांनी दिलेल्या कर्जाचा हप्ता गोळा करून द्यावा, अशी अट कंपनीची असते. कर्मचारी प्रत्येक घरी जात पैसे वसूल करतात. एखाद्या महिलेने हप्ता कमी दिला तर तो स्वीकारला जात नाही. यात महिलेवर दबाव टाकला जातो. एकूण हा फास आवळताना दिसत असून प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे.(वार्ताहर)