पाण्याअभावी ‘रोपटे’ मोजत आहेत शेवटची घटिका
By Admin | Updated: February 17, 2017 02:16 IST2017-02-17T02:16:07+5:302017-02-17T02:16:07+5:30
शहरातील बजाज चौक ते शिवाजी चौक या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकात स्थानिक पालिका प्रशासनाच्यावतीने

पाण्याअभावी ‘रोपटे’ मोजत आहेत शेवटची घटिका
पाण्याअभावी ‘रोपटे’ मोजत आहेत शेवटची घटिका
पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज : मुख्य मार्गावरील प्रकार
वर्धा : शहरातील बजाज चौक ते शिवाजी चौक या मुख्य मार्गावरील रस्ता दुभाजकात स्थानिक पालिका प्रशासनाच्यावतीने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व ओळखून ठिकठिकाणी विविध प्रकारचे रोपटे लावले. परंतु, सध्या हे रोपटे पाण्याअभावी शेवटची घटीका मोजत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. याकडे पालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.
समाजातील सर्व स्तरातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी कार्य केले जात असून शासनाच्यावतीनेही विविध योजना राबविल्या जात आहेत. शासनाच्या वृक्षसंवर्धनाच्या योजनेचा एक भाग म्हणून स्थानिक नगर पालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या सुरूवातीला वर्धा शहरातील बजाज चौक ते शिवाजी चौक परिसरातील रस्ता दुभाजकात वृक्ष लावले. पावसाळ्यात त्या वृक्षांना पावसाच्या सरींनी आधार मिळाल्याने ते रोपटे जानेवारी अखेरपर्यंत हिरवेकंच होते. परंतु, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उकाडा वाढल्याने व तापमानात वाढ झाल्याने सध्या या रोपट्यांनी पाण्याअभावी माना टाकल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
शहरातील मुख्य मार्ग परिसरात रस्ता दुभाजकात लावण्यात आलेले विविध प्रजातीची रोपटे जगविण्याकडे संबंधीतांचे सध्या दुर्लक्ष होत असल्याने वृक्षसंवर्धनाच्या उद्देशालाच फाटा मिळत आहे. सदर प्रकार गंभीर असल्याने याकडे पालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची शहरातील वृक्षप्रेमींसह नागरिकांची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)