दिग्गजांच्या लढतीत ‘कही खुशी, कही गम’
By Admin | Updated: February 24, 2017 02:12 IST2017-02-24T02:12:04+5:302017-02-24T02:12:04+5:30
निवडणुकीत सावंगी(मेघे) गटातून भाजपाचे दिग्गज उमेदवार जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, शेकापूर(बाई) गटातून

दिग्गजांच्या लढतीत ‘कही खुशी, कही गम’
भाजपलाच कौल : काँगे्रसच्या मोेठ्या नावांचा पराभव
वर्धा : निवडणुकीत सावंगी(मेघे) गटातून भाजपाचे दिग्गज उमेदवार जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, शेकापूर(बाई) गटातून शिक्षण व आरोग्य समिती सभापती वसंत आंबटकर, वायगाव(नि.) गटातून माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, भिडी गटातून काँग्रेसचे उमेदवार व आ. रणजित कांबळे यांचे कट्टर समर्थक मनोज वसु, ंिहगणी गटातून माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल, झडशी गटातून भाजपाचे वरुण दफ्तरी, पोहणा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांना पराभवाचे तोंड पहावे लागले, तर हिंगणी गटातून भाजपाचे दिग्गज उमेदवार राणा रणनवरे यांनी काँग्रेसचे माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव करुन विजय संपादन केला. तरोडा गटातून काँग्रेसचे वर्धा बाजार समिती उपसभापती पांडुरंग देशमुख यांची पत्नी उज्वला देशमुख, तर अल्लीपूर गटातून माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे यांच्या पत्नी विभा ढगे विजयी झाल्या. अंदोरी गटातून माजी जि.प. उपाध्यक्ष राकाँचे संजय कामनापुरे हे दुसऱ्यांदा विजयी झाले. हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर बाई गटातील कुटकी गणातून भाजपचे उमेदवार प्रफुल्ल बाडे यांच्यावर काँग्रेसचे आशिष पोपटकर यांनी एका मताने विजय संपादन केला, तर सेलू तालुक्यातील झडशी गटातील रिधोरा गणातून भाजप उमेदवार योगेश रणनवरे ईश्वर चिठ्ठीने विजयी झाला.
आठही तालुक्याच्या मुख्यालयी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीपर्यंत अनेकांनी आपापल्या परीने अंदाज वर्तविताना या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष असणार, मात्र सत्ता स्थापनेसाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार असे बोलले जात होते. मात्र हे सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपाने एकहाती सत्ता हस्तगत करुन जिल्हा भाजपमय केला. या निवडणुकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार हे भाजपाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. ही निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची झाली होती.
काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, आ. रणजित कांबळे, आ. अमर काळे, वर्धेचे माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आ. सुरेश देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु भाजपची लाट थोपविण्यात ही मंडळी अपयशी ठरली. शिवसेनेने गिरड व जाम गटात अनपेक्षित यश मिळवून आश्चर्याचा धक्का दिल्याने शिवसेना नेते माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांची बाजू राखली. बसपाचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांनी सावंगी(मेघे) गटात भाजपचे उमेदवार विलास कांबळे आणि काँग्रेसचे उमेदवार विलास दोड यांच्यातील शत्रुत्वाचा अचुक राजकीय फायदा घेत येथे विजय संपादन केला, तसेच सिंदी(मेघे) गटातही भाजपात उमेदवारी वाटपावरुन झालेल्या भांडणाचा बसपाने नियोजनबद्धरित्या फायदा घेत आपला उमेदवार निवडून आणला.
पंचायत समितीतही भाजपाची सरशी
अशीच अवस्था पंचायत समितीची राहिली आहे. आठही पंचायम समितीत १०४ पैकी तब्बल ५८ जागा भाजपाने बळकाविल्या आहेत. काँग्रेसला ३१ जागांवर समाधान मानावे लागले आहे. येथे काँगे्रसही वाढली आहे. २०१२ मध्ये आठही पंचायत समितीत काँग्रेसला २८ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच फटका सहन करावा लागल. या निवडणुकीत राकॉला ५ केवळ जागा मिळाल्या. २०१२ च्या निवडणुकीत राकाँला २२ जागा होत्या. या व्यतिरिक्त शिवसेना १, स्वभाप १, बसपा २ आणि ६ जागा अपक्षांना मिळाल्या आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)