गोटुल निर्माण लढ्यातच ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ची बीजे
By Admin | Updated: October 27, 2014 22:41 IST2014-10-27T22:41:38+5:302014-10-27T22:41:38+5:30
आदिवासीच्या जीवनाची सांस्कृतिक व सामाजिक धरोहर असणाऱ्या ‘गोटुल’च्या निर्मितीचा लढा सुरू केला. यातूनच आमचे बांधव प्रथमत: एकजूट झाले, निकराचा तो लढा होता.

गोटुल निर्माण लढ्यातच ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ची बीजे
वर्धा : आदिवासीच्या जीवनाची सांस्कृतिक व सामाजिक धरोहर असणाऱ्या ‘गोटुल’च्या निर्मितीचा लढा सुरू केला. यातूनच आमचे बांधव प्रथमत: एकजूट झाले, निकराचा तो लढा होता. आमच्या गावाच्या शेजारच्या जंगलातील सागवान तोडूनच गोटुल उभाराचं हा महिलांचा निग्रह होता. त्यात मोठा पुढाकारही त्यांचा होता. या लढ्यातूनच आमच्यात लढवय्ये बळ आले. पुढे यातूनच एक-एक आंदोलन उभे राहिले. ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ ची बीजं या आंदोलनातून सापडली, असे प्रतिपादन मेंढा-लेखाचे शिल्पकार आणि ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या आंदोलनाचे प्रणेते देवाजी तोफा यांनी तपोधन श्रीकृष्णदास जाजू स्मृती समारोहात पुरस्कार वितरण प्रसंगी घेण्यात आलेल्या मुलाखतीत बोलताना केले. डॉ. उल्हास जाजू यांनी लेखामेंढाचे गावकरी व त्याची ही मुलाखत घेतली. याप्रसगी मोहन हिराबाई हिरालाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
रविवारी झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘गोकुल अपना गांव रे’ हे गीत सुरमणी वसंत जळीत यांनी सादर केले. यानंतर डॉ. सुहास जाजू यांनी देवाजी तोफा, मोहन हिराबाई हिरालाल यांच्यासह लेखामेंढांच्या २५ पुरूष-महिलांचा परिचय करून दिला. मुलाखतीची सूत्रे सांभाळण्याआधी तपोधन श्रीकृष्णदास जाजू कृतज्ञता निधी लेखामेंढाच्या गावकऱ्यांना सस्रेह अर्पण करण्यात आला. आजपर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील २० जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
आदिवासीची सांस्कृतिक केंद्र असलेले ‘गोटुल’ निर्मितीची कथा सांगा या प्रश्नवर देवाजी तोफा यांनी संपूर्ण हकीकतच सांगितली. या आधी डॉ. उल्हास जाजू यांनी मोहन हिराबाई हिरालाल यांना विचारले, मेंढा लेखाच्या प्रेमात कसे काय पडलात? यावर ते म्हणाले, गांधी-विनोबा यांच्या ‘हिंद स्वराज्य’ आणि ‘स्वराज्य शास्त्र’ मध्ये वर्णीत आदर्श गाव मला कुठेच दिसले नाही. मेंढा लेखा गावात मला गांधी-विनोबाच्या स्वप्नातील गाव लख्खपणे दिसले. हेच आपल्या जीविताचे कर्तव्य ठिकाण म्हणून मी लेखामेंढाच्या प्रेमात पडल्याचे ते म्हणाले.
येथील ग्रामसभा खरी ताकद आहे. ही ग्रामसभा प्रतिनिधीक नाही तर सहभागी लोकतंत्रावर आधारित आहे. या ग्रामसभेतून आमची अस्मिता तिचे संवर्धन याची जाणीव होऊनच मानव निर्माण झाले आहे. समता-बंधुता आणि संहिता याचे ब्रीद बनले आहे. ग्रामसभा, ग्रामसभेचा आधार ‘चुनाव’ नाही तर ‘मनाव’ आहे.
ग्रामसभेच्या कार्याचे मोठे यश कोणते याविषयी सांगताना देवाजी म्हणाले, बांबु विक्रीच्या संबंधित कायदा जो मेंढालेखाने निर्माण केला. हे सर्वात मोठे यश होय. एका वर्षात आमच्या गावाला १ कोटी १५ लाखांचा बांबू विकून नफा झाला. गावात सर्वच काम सार्वत्रिक असतात. कोणतेही काम वैयक्तीक नाही. याची माहिती देताना त्यांना गावात दिवे लावताना झालेल्या शंभर रुपयांच्या किस्याची आठवण दिली. आमची सर्व आंदोलने अहिंसक पद्धतीने झालीत, शिव्या, मारहाण, लाठीकाठी याचा आधार आम्ही कधीच घेतली नाही.
या पुरस्कारांसाठी निवड करतांना त्यांच्या कार्यस्थळावर प्रत्यक्ष जाऊन कार्य जाणून घेवून निवड केली जाते. हे विशेष. या कार्यक्रमाची सांगता ‘युग की जडता के खिलाफ, एक इन्कलाब है, हिंद के जवानोंका एक सुनहरा ख्वाब है’ गिताने झाला.
कार्यक्रमाला मूलचंद बडजाते, नारायणदास जाजू, रवीशंकर शुक्ल, डॉ. अरूण पावडे, विजय जावंधिया व शहरी प्रतिनिधी नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)