विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला

By Admin | Updated: January 20, 2015 00:09 IST2015-01-20T00:09:07+5:302015-01-20T00:09:07+5:30

शाळेच्या स्वच्छतागृहात शिरून एका युवकाने धारदार शस्त्राने एका विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना

Fierce attack on girl student | विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला

विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला

वायगाव येथील यशवंत विद्यालयातील घटना : हल्लेखोर अज्ञात युवक
वर्धा : शाळेच्या स्वच्छतागृहात शिरून एका युवकाने धारदार शस्त्राने एका विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना वायगाव (निपानी) येथील यशवंत विद्यालयात घडली असून, हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून असल्याने त्याला ओळखणे कठीण असल्याचे विद्यार्थिनीने सांगितले. याप्रकरणी वायगाव पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. ही थरारक घटना सोमवारी सकाळी ९.२० वाजताच्या सुमारास घडली.
माहिती शाळेतील काही विद्यार्थ्यांना कळताच त्यांनी शिक्षकांसह स्वच्छतागृहाकडे धाव घेतली. शिक्षक व विद्यार्थी येत असल्याचे दिसताच त्या युवकाने पळ काढला. यावेळी सदर विद्यार्थिनी बेशुद्धावस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले. शाळेच्या शिक्षकांनी तिला गावातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत तिच्या हातावर एकूण २२ जखमा असल्याचे निदर्शनास आले. या जखमा नेमक्या कशाच्या याचा खुलासा मात्र झाला नाही. याची माहिती सदर विद्यार्थिनीच्या आईला देण्यात आली. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून या अनोळखी युवकाविरूद्ध देवळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित विद्यार्थिनी अकराव्या वर्गात शिक्षण घेत असून, तिचा एक अनोळखी युवक सतत पाठलाग करीत होता. आज शाळेतून सदर मुलगी मंध्यातराच्या सुट्टीत लघुशंकेसाठी गेली होती. तेथे आरोपी युवक आधीच लपून होता. ती एकटी असल्याचे बघून आरोपीने तिच्यावर थेट हल्ला केला. हा युवक काही दिवसांपूर्वी तिच्या घरीही गेला असल्याची माहिती या प्रकरणातून समोर आली आहे. दहा दिवसांपूर्वी एका युवकाने सदर युवतीच्या घरात शिरून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती. शिवाय घटनेची कुठे वाच्चता केल्यास युवतीच्या आई व भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सदर युवतीच्या आईने सांगितले आहे. यावेळीही या युवकाने चेहऱ्यावर रूमाल बांधला असल्याने त्याची ओळख पटली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
जखमी झालेल्या युवतीची आई दारूबंदी मंडळात कार्यरत असून तिला अनेकांचा विरोध आहे. याच कारणाने सदर युवतीवर हल्ला करण्यात आला असावा असा संशय शाळेच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या ४५२, ३५४ (ब),(ड), ५०६, ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.(तालुका प्रतिनिधी)
सदर मुलगी घरी असताना दहा दिवसांपूर्वी तिच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळीही तिला मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे पीडित मुलीचे कुटुंब धास्तावलेले होते. मात्र या प्रकरणाची तिच्या पालकांकडून पोलिसात तक्रार करण्यात आली नव्हती. घटनेची पुनरावृत्तीझाल्यानंतर तिच्या आईने याबाबत पोलिसात धाव घेतली.
हल्ल्याचे नेमके कारण गुलदस्त्यात
सदर युवतीवर झालेला हल्ला सूड भावनेतून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या युवतीची आई दारूबंदी महिला मंडळात सक्रीय असल्याचे शाळेकडून सांगण्यात आले आहे. त्यातूनच हा हल्ला झाला असावा. मात्र पोलीसांनी हा हल्ला एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान पोलीस तपासात या दोन्ही बाबीवर सखोल चौकशी करीत आहे. आरोपीला अटक केल्यानंतरच या प्रकरणाचे रहस्य उलडणार आहे.

Web Title: Fierce attack on girl student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.