पांदण रुंदीकरणात शेताचे नुकसान
By Admin | Updated: February 19, 2015 01:23 IST2015-02-19T01:23:54+5:302015-02-19T01:23:54+5:30
भिवापूर शिवारात पांदण रस्त्याचे रूंदीकरण होत आहे़ या रस्त्याचे मोजमाप न करता बांधकाम केले जात असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे़...

पांदण रुंदीकरणात शेताचे नुकसान
वर्धा : भिवापूर शिवारात पांदण रस्त्याचे रूंदीकरण होत आहे़ या रस्त्याचे मोजमाप न करता बांधकाम केले जात असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे़ भेदभाव करीत धनिकांना झुकते माप देत गरीब शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान केले जात आहे़ यामुळे असंतोष पसरला असून याबाबत महसूल विभागासह पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली; पण अद्याप पाहणी झाली नाही़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
मौजा भिवापूर शिवारात एका राजकीय पुढाऱ्याने तीन वर्षांपूर्वी शेत घेतले़ त्या मार्गावर पांदण रस्त्याच्या बांधकामास सुरूवात झाली आहे़ त्या रस्त्याच्या कडेला पाणी जाण्यासाठी बांध खोदला जात आहे़ यात काही सधन शेतकऱ्यांनी आपल्या शेताचे कुंपण अतिक्रमण करून रस्त्यावर आणले़ हे कुंपण न काढता दूरून खोदकाम केले जात आहे तर दुसरीकडे रूंदीकरणात जागा अपुरी पडत असल्याने गरीब शेतकऱ्यांच्या शेतातून बांधाचे खोदकाम केले जात आहे़ जेसीबीने सुरू असलेल्या या खोदकामास शेतकऱ्यांनी विरोध केला असता रात्री काळोखात खोदकामाचा सपाटा लावला़ ही बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच वायागव (नि़) पोलिस चौकी येथे लेखी तक्रार नोंदविली; पण अद्याप अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली नाही़ शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर करून शेताचे नुकसान थांबविण्याची मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)