दर कपातीला काही कंपन्यांची बगल

By Admin | Updated: June 18, 2015 01:45 IST2015-06-18T01:45:45+5:302015-06-18T01:45:45+5:30

यावर्षी खरिपाच्या पेरणीला जेमतेम सुरूवात झाली. शेतकऱ्यांच्या कल कपाशीच्या लागवडीकडे आहे. शासनाने ठरवून दिलेल्या

A few companies close to the cut-off | दर कपातीला काही कंपन्यांची बगल

दर कपातीला काही कंपन्यांची बगल

कृषी केंद्र चालकांची कोंडी : बियाण्यांचे दर १०० रुपयांनी कमी करण्याचे आदेश
अमोल सोटे ल्ल आष्टी(शहीद)
यावर्षी खरिपाच्या पेरणीला जेमतेम सुरूवात झाली. शेतकऱ्यांच्या कल कपाशीच्या लागवडीकडे आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरामध्ये प्रती बॅग १०० रूपये कपात केली आहे. परंतु काही बियाणे कंपन्यांनी शासनाचा आदेश डावलून अद्याप दर कमी केलेले नाही. त्यामुळे अशा कंपन्यांची बियाणे घेतलेले कृषी सेवा केंद्रचालक संकटात सापडले आहे तर दुसरीकडे शेतकरी तक्रारीवर तक्रारी करीत आहे.
राज्य शासनाने ८ जून २०१५ पासून संकरित कपाशी बियाण्याचे दर १०० रू. कमी केले. आधीचे दर बीजी १-८३० रूपये असेल तर आता ७३० आणि बीजी २- ९३० रूपये असेल तर आता ८३० रूपये निर्धारित करून दिले. खरीप बियाणे घेणाऱ्या कृषी सेवा केंद्रचालकांना तीन कंपन्यांव्यतिरिक्त सर्व कंपन्यांनी शेतकऱ्याचे व दुकानादाराचे हित लक्षात घेऊन सुरूवातीलाच दर कमी केले. परंतु या तीन कंपन्यांनी कायद्याची पळवाट काढून दुकानदारांना ८ जूनपूर्वीच्या जुन्याच दराने बियाणे विका व आमचे पूर्ण बिल द्या, असे बजावून सांगितले.
शासनाचे व कायद्याचे बंधन असल्यामुळे कृषी सेवा केंद्रचालक ठरवून दिलेल्या ७३० व ८३० रूपये भावाने बियाणे विकत आहे. परंतु या तीन कंपन्यांची बियाणे विकताना कृषी केंद्रचालकांना १०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यासाठी कृषी अधिकारी केंद्राला भेटी देवून नमुने तपासणीला पाठवत आहे. असे असले तरी कृषी केंद्रचालकांना या बियाणे कंपन्या हुकूमशाही पद्धतीने वागणूक देत आहे. कृषी विभागाने बियाणे कंपन्यांना ठरवून दिलेल्या भावाची अंमलबजावणी प्रत्यक्षात केली नसली तरी कृषी सेवा केंद्रचालक अंमलबजावणी करीत आहे. परंतु आता त्यांच्याकडून वसुलीसाठी कंपन्यांनी तगादा लावला आहे. याप्रकरणी कृषिमंत्र्यांना लेखी तक्रार कृषी केंद्रचालकांनी केली आहे.

राज्यातील तीन कंपन्या सोडून बाकी कंपन्यांनी कृषीसेवा केंद्रचालकांना कपाशी बियाण्यांचे दर कमी करून दिले आहेत. त्यामुळे या कंपन्यांनीही बियाण्यांचे दर कमी करणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्यावर शासनस्तरावर कारवाई करणेही गरजेचे आहे.
सोनू भार्गव,संचालक कृषी सेवा केंद्र, आष्टी (शहीद.)

शेतकऱ्यांना शासन भावानुसार बियाणे विकणे सुरू आहे. बियाणे कंपन्यांनी नवीन भावाप्रमाणे आम्हाला बियाणे दिले नाही. यासाठी कंपन्यांशी बोलणी सुरू आहे. शासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे.
दिनेश बुले,संचालक कृषीसेवा केंद्र, तळेगाव (श्या.पं.)

शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच बियाणे विक्री सुरू आहे. कंपन्यांनी भाव कमी करून कृषी सेवा केंद्र संचालकांना दिलासा देणे आवश्यक आहे.
विजय मेंढजोगे,तालुका कृषी अधिकारी,
आष्टी (शहीद.)

Web Title: A few companies close to the cut-off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.