कडाक्याच्या थंडीतही निवडणुकीचा ज्वर
By Admin | Updated: November 18, 2016 02:18 IST2016-11-18T02:18:19+5:302016-11-18T02:18:19+5:30
सिंदी नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २७ नोव्हेंबरला होत आहे. स्थानिक नगर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष

कडाक्याच्या थंडीतही निवडणुकीचा ज्वर
न.प. सिंदी (रेल्वे) : आजी-माजी दिग्गजांनी कसली कंबर
प्रशांत कलोडे सिंदी (रेल्वे)
सिंदी नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २७ नोव्हेंबरला होत आहे. स्थानिक नगर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता राजकीय पक्षासह अपक्ष असे ७ उमेदवार रिंगणात आहे तर १७ नगरसेवक पदाकरिता राजकीय व अपक्ष असे ८६ उमेदववार निवडणुकीच्या रिंगणात आहे. १ नगराध्यक्ष व १७ नगरसेवक निवडीसाठी उमेदवारामध्ये झुंज रंगणार असून प्रचाराच्या रणधुमाडीत कडाक्याच्या थंडीतही वातावरण तापलेले दिसत आहे.
वाढत्या थंडीतही उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत मतदारांच्या भेटी घेण्यासाठी व मतदानाचा जोगवा मागण्यासाठी एकापाठोपाठ एक मतदारांच्या दारी जाताना दिसून येत आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय जयस्वाल यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह नुकताच प्रचाराचा नारळ फोडण्यात आला तर सिंदी-हिंगणघाट मतदार संघाचे आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत मिरवणुकीने भाजपा पक्षाने नुकताच प्रचाराचा नारळ फोडून पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचा चंग बांधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्याच्या नेत्याच्या गैरहजरीत स्थानिक नेत्यांसह प्रचाराचा नारळ फोडून बॅनर युद्ध व लाऊडस्पीकरच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली आहे. तसेच अपक्ष उमेदवारही आपल्या कार्यकर्त्यांसह निवडणुकीत कुठेही मागे दिसत नसल्याचे चित्र स्पष्ट जाणवत आहे.
न.प. च्या निवडणुकीत यंदा १० हजार ४३४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून प्रभाग १ ते ७ मध्ये दोन उमेदवार तर प्रभाग ८ हा ३ उमेदवारांचा सर्वात मोठा प्रभाग आहे.
नगराध्यक्ष पदाकरिता ७ उमेदवार रिंगणात आहे. प्रचाराच्या प्रथम फेरीला सुरूवात झालेली असून काही उत्साही युवक वर्ग प्रचाराच्या रणधुमाळीत सामील होताना दिसत आहे. यात सट्टा बाजार सुद्धा सक्रीय असून कोणता उमेदवार निवडून येणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा निवडणुकीला रंगत येत आहे. उमेदवारांमध्ये चांगलीच चढाओढ सुरू आहे.