महोत्सवामुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होईल
By Admin | Updated: October 2, 2016 00:45 IST2016-10-02T00:45:24+5:302016-10-02T00:45:24+5:30
भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण होत असल्यामुळे देशभक्तीची भावना सामान्य नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी केंद्र सरकारने ‘७० साल आजादी,

महोत्सवामुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होईल
रामदास तडस : गांधी जयंतीनिमित्त सेवाग्राम आश्रमात देशभक्तीपर चित्रपट महोत्सव
वर्धा : भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण होत असल्यामुळे देशभक्तीची भावना सामान्य नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी केंद्र सरकारने ‘७० साल आजादी, याद करो कुर्बानी’ या देशभक्तीपर फिल्म महोत्सवाचे सेवाग्राम येथे आयोजन केले आहे. या महोत्सवामुळे येथील सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्याच्या इतिहासाबद्दल माहिती मिळून देशभक्तीची भावना निर्माण होईल, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी फिल्म महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयच्या फिल्म समारोह निर्देशालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने सेवाग्राम आश्रमातील शांती भवन येथे आयोजित फिल्म महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानावरून खा. तडस बोलत होते. यावेळी सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष जयंत मठकर, सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या अधिनस्त फिल्म समारोह निर्देशालयाच्या उपसंचालक तनू रॉय, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे उपस्थित होते.
तडस म्हणाले, या ऐतिहासिक पावनभूमित महात्मा गांधीनी स्वातंत्र्याची मुर्हुतमेढ रोवली आहे. अशा पावन भूमित देशभक्ती पर चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या ज्ञात अज्ञात विरांनी देशासाठी बलीदान दिले. त्या शहिदाची आठवण या चित्रपट महोत्सवामुळे येईल. सेवाग्राम आश्रमाचा जगात गांधीच्या नावाने नावलोकिक आहे. या आश्रमाचा भौतिक विकास करण्यासाठी राज्य शासनाने विकास आराखडा तयार केला असून सेवाग्रामचा विकास करण्यासाठी मान्यता दिली आहे, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आश्रम प्रतिष्ठाणचे जयंत मठकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून उपसंचालक तनू रॉय यांनी भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतातल्या काही शहरामध्ये अशा देशभक्ती पर चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. १५ आॅगस्ट रोजी दिल्ली येथून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली असून महाराष्ट्रात सेवाग्राम आश्रमची निवड यासाठी करण्यात आली. या महोत्सवात स्वातंत्र्य संग्राम सेनानीवर आधारित चित्रपट येथे दाखविण्यात येणार आहे. यामुळे देशभक्तीची भावना पुन्हा विद्यार्थ्यांना प्रज्वलीत करण्याची संधी मिळाली आहे. तसेच भावी पिढीला स्वातंत्र्याच्या महानायकांनी जो संघर्ष केला. बलीदान दिले त्याची माहिती नवीन पिढीला होईल असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनुपमा गुप्ता यांनी केले तर आभार जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांनी मानले. कार्यक्रमाला संजय इंगळे तिगावकर, अविनाश काकडे आश्रमातील नागरिक, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)