ठराविक कंत्राटदारांना कामे देण्याचा घाट
By Admin | Updated: June 3, 2016 02:15 IST2016-06-03T02:15:02+5:302016-06-03T02:15:02+5:30
स्थानिक नगर पालिकेकडून होणाऱ्या कामांच्या ई-निविदेची शेवटची तारीख १ जून होती; पण यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतो.

ठराविक कंत्राटदारांना कामे देण्याचा घाट
संघटनेचा आरोप : स्थगनादेश कायम राहणार-एसडीओ
आर्वी : स्थानिक नगर पालिकेकडून होणाऱ्या कामांच्या ई-निविदेची शेवटची तारीख १ जून होती; पण यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतो. काही ठराविक कंत्राटदारांना जाणीवपूर्वक फायदा व्हावा म्हणून ई-निविदेच्या कामासाठी पूर्वीच हातमिळवणी झाली. यामुळे ठराविक कंत्राटदारांना कामे देण्यात येणार आहे, असा आरोप युवा स्वाभीमान संघटनेने केला.
गत एक आठवड्यापासून अनेक कंत्राटदार नोंदणीसाठी नगर पालिकेत चकरा मारत होते; पण जबाबदार अधिकारी टाळाटाळ करीत होते. शिवाय चार दिवसांपासून नगर पालिकेचा दूरध्वनी बंद करून अधिकारी बेपत्ता आहे. या पद्धतीने ई-निविदा झाली तर स्पर्धा होणार नाही आणि शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी बुडेल. यामुळे या प्रकरणात जातीने लक्ष देत आर्वी नगर पालिकेला ई-निविदेची तारीख वाढवून नवीन कंत्राटदारांची नोंद घेण्याचे निर्देश द्यावे. १ जूनच्या ई-निविदा प्रक्रियेची मुदत वाढवावी. नगर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास बाध्य करावे, आदी मागण्या युवा स्वाभीमानच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनातून लावून धरल्या. याप्रंगसी उपविभागीय अधिकारी मनोहर चव्हाण यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. जोपर्यंत नगर पालिकेत नवीन कंत्राटदारांची नोंद घेतली जाणार नाही, तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थगनादेश कायम राहिल, अशा आशयाचे पत्र त्यांनी आंदोलकांना दिले. ठिय्या आंदोलनात युवा स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष दिलीप पोटफोडे, प्रवीण वानखेडे, प्रवीण गेडाम, मंगेश लांडगे, मंगेश लांजेवार, आकाश काळे, सिद्धांत कळंबे, आतीश शिंगाने, अवचारे, सोनू अवचारे, शैलेश भिवगडे, सुमीत शेंडे, विक्की पाटील, सलीम शहा यांचा सहभाग होता.(तालुका/शहर प्रतिनिधी)