संत्रा गारपीटग्रस्तांच्या अनुदानात अफरातफर
By Admin | Updated: August 20, 2014 23:42 IST2014-08-20T23:42:05+5:302014-08-20T23:42:05+5:30
कारंजा तालुक्यातील साझा कुंडी व ठाणेगाव येथील गारपीटग्रस्त संत्रा बागायतदारांकडून येथील तलाठी कुकडे यांनी आर्थिक व्यवहार करून अनुदानाच्या रकमेची अफरातफर केली. त्यामुळे

संत्रा गारपीटग्रस्तांच्या अनुदानात अफरातफर
तलाठ्यावर कारवार्ईची करा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ंवर्धा : कारंजा तालुक्यातील साझा कुंडी व ठाणेगाव येथील गारपीटग्रस्त संत्रा बागायतदारांकडून येथील तलाठी कुकडे यांनी आर्थिक व्यवहार करून अनुदानाच्या रकमेची अफरातफर केली. त्यामुळे लाभार्थी असलेल्या खऱ्या संत्रा बागायतदारांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. याप्रकरणी तलाठी कुकडे यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी प्रहार युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी नवीन सोना यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, साझा कुंडी व साझा ठाणेगाव येथे कार्यरत असलेले तलाठी कुकडे यांनी संत्रा बागायतदार शेतकऱ्यांंना सन २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये मिळालेल्या गारपीट अनुदानाच्या रकमेमध्ये आर्थिक गैरव्यवहार केला. २०१२-१३ च्या संत्रा बागायत अनुदानाची रक्कम कुकडे यांनी येथील एका पं. स. सदस्याचे वडील जानराव पांडूरंग उकंडे यांच्या नावाने जमा केली. वास्तवात मात्र जानराव उकंडे यांच्या मौजा कुंडी येथील शेत नं. २९९ मध्ये कुठल्याही प्रकारची संत्रा बाग नाही. सदर शेतामध्ये खरीप हंगामाचे पीक घेतल्या जाते. तरी सुद्धा तलाठी कुकडे यांनी उकंडे यांच्या शेत नं. २९९ मधील आराजी ०.४० हे.आर. मध्ये संत्रा बागायत दाखवून अनुदानाची रक्कम त्यांना मिळवून दिली आहे.
२०१३-१४ मध्येही गारपीटग्रस्त संत्रा बागायतदारांना अनुदान देण्यात आले. यातही तलाठी कुकडे यांनी जानराव उकंडे यांची ०.२० हे. आर मधील जमीन संत्रा गारपीटग्रस्त दाखवून १८,५०० रुपये अनुदानाची रक्कम त्यांना मिळवून दिली. अशाच प्रकारचे अनुदान या तलाठ्याने इतरांनाही मिळवून दिल्याचे निवेदनात नमूद आले. जनार्दन रामचंद्र शेंदरे व इतर चौघांच्या नावाने असलेल्या शेत नं.६६ या शेतातील शेत नं. ३७/१ मध्ये आराजी ०.३६ हे. आर.मध्ये संत्रा बागायत दाखवून २१ हजाराच्या अनुदानाची अफरातफर केली. परंतु सदर शेत स.नं. ३७/१ हे कलावतीबाई जनार्दन शेंदरे यांच्या नावे आहे. त्यांना सुद्धा आराजी ०.१५ हे. आर. मध्ये संत्रा बागायत दाखवून ३ हजार ७५० रुपयांचे अनुदान मिळवून दिले आहे. गुणवंत यादवराव भक्ते यांच्या नावे शेत नं. २३ असून त्यांनीही शेतात संत्राची लागवड केली आहे. सदर संत्रा झाडांचे वय केवळ २ वर्षाचे आहे. तरीसुद्धा सदर तलाठ्याने आराजी ०.१५ हे.आर. मध्ये संत्र्याचे नुकसान दाखवून ९ हजाराचे अनुदान लाटले. अशाप्रकारे तलाठी कुकडे यांनी सन २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये गारपीट अनुदान वाटपाच्या रकमेमध्ये आर्थिक व्यवहार करून खोट्या संत्रा बागायदतारांना संत्रा गारपीट नुकसानाचे अनुदान वाटप केलेले आहे. यामुळे खरे नुकसानग्रस्त संत्रा बागायतदार गारपिटीच्या अनुदानापासून वंचित राहिले. या प्रकारामुळे ज्यांच्या संत्र्यांचे गारपिटीमुळे नुकसान झाले त्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे तलाठी कुकडे यांची तातडीने कार्यालयीन चौकशी करावी आणि त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी प्रहार युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी सोना यांना निवेदनाद्वारे केली आहे.(शहर प्रतिनिधी)