फेब्रुवारीतच उन्हाचा पारा तिशी पार
By Admin | Updated: February 18, 2015 01:53 IST2015-02-18T01:53:13+5:302015-02-18T01:53:13+5:30
गत वर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यासह राज्यातही पाऊस नगण्य झाला. त्यामुळे उकाडा लवकर सुरू होणार असे भाकित सर्वत्र वर्तविले जात होते.

फेब्रुवारीतच उन्हाचा पारा तिशी पार
वर्धा : गत वर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यासह राज्यातही पाऊस नगण्य झाला. त्यामुळे उकाडा लवकर सुरू होणार असे भाकित सर्वत्र वर्तविले जात होते. पण त्याची चाहूल फे ब्रुवारीतच लागली आहे. याच महिन्यात पारा दररोज तिशी पार करीत आहे. त्यामुळे मे, जून कडे काय चित्र राहणार याचा विचार आतापासूनच यायला लागला आहे.
दरवर्षी मार्च महिन्याच्या पंधरवाड्यानतर उन्हं तापायला सुरूवात होते. परंतु या वर्षी राज्यासह जिल्ह्यात पाऊस कमी पडला. याचा सरळ परिणाम तापनामावर झाला. आता जेमतेम फेब्रुवारी महिना सुरू आहे. याच महिन्यात मधले पावसाचे दिवस सोडता दररोज पारा ३० चा आकडा पार करत आहे. त्यामुळे लवकरच थंड पदार्थाची विक्री जोमात सुरू होणार असे चित्र शहरात दिसत आहे.
गतवर्षी जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. त्यामुळे गारठाही बराच काळ होता. यंदा मात्र अवघा एक महिनाही गारठा जाणवला नाही. काहीच दिवस थंडीची लाट होती. त्यानंतर मात्र थंडी गायब झाली ती कायमचीच. गत आठवड्यात जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे दोन दिवस धुक्याची लाट होती. पिकांचेही नुकसान झाले.
ढगाळ वातावरण आणखी काही दिवस राहण्याची शक्यता होती. पण वातावरण खुलून लगेच उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली. सध्या दहा ते पंधरा दिवसांपासून पारा दररोज तिशी पार करीत आहे. अद्याप मार्च महिनाही सुरू झालेला नाही. आतापासूनच उन्हाची दाहकता जाणवत असल्याने एप्रिल महिन्यात काय हाल होतील असा विचार प्रत्येकालाच स्पर्शून जात आहे. शहरातील सिमेंट रस्ते आतापासून तापायला लागले आहे.(शहर प्रतिनिधी)