वैशिष्ट्यपूर्ण निधी अखर्चितच
By Admin | Updated: February 26, 2015 01:22 IST2015-02-26T01:11:22+5:302015-02-26T01:22:36+5:30
येथील नगरपरिषदेच्या विकासाकरिता तत्कालीन माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी दोन कोटी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला.

वैशिष्ट्यपूर्ण निधी अखर्चितच
सुरेंद्र डाफ आर्वी
येथील नगरपरिषदेच्या विकासाकरिता तत्कालीन माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी दोन कोटी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला. सत्तांतर झाल्यावर २०११ पासून मंजूर निधी असताना कामे झाली नाहीत. पहिले मंजूर असलेल्या कामाकरिता पालिकेने पुन्हा शुक्रवारी सर्वसाधारण सभेत ठराव घेतल्याने आर्वीतही श्रेय लाटण्याचा प्रकार होत असल्याची चर्चा जोर धरत आहे.
शहर विकास आराखड्यांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत आर्वीतील आठवडी बाजारात ओटे व सौदर्यीकरणाला मान्यता दिली होती. त्याला जिल्हाधिकारी व नगर रचनकार विभागाने मंजुरी दिली. त्याकरिता अधीक्षक अभियंता चंद्रपूर यांच्याकडून इंदिरा चौकातील आठवडी बाजाराची जुनी इमारत पाडून नवे बांधकाम करण्यात येणार होेते.
कामांना मंजुरी मिळाली त्यावेळी पालिकेवर कॉग्रेसची सत्ता होती. त्यामुळे आमदार अमर काळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्याकडून हा विशेष निधी मंजूर करून आणत त्यांच्या हस्ते भूमिपूजनही केले. लगेच आर्वी न.प.च्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. आचारसंहिता लागली. अशात सत्तांतर होऊन पालिकेत भाजपाची सत्ता आली. त्यांनी अद्यापही मंजूर काम केली नाहीत. या कामांचा निधी चार वर्षापासून अखर्चीतच आहे. विशेष म्हणजे आर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा नियोजन समिती १३ व्या वित्त आयोगांतर्गत आठवडी बाजारातील ओटे बांधकाम करण्यास निधीच्या मागणीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. चार वर्षाआधीच या कामाचा निधी व प्रशासकीय मंजुरी असताना या कामाचा ठराव रद्द केल्याची माहिती आहे.
विकास कामांचे सर्वच ठराव रद्द
आर्वीतील इंदिरा चौकातील भाजी व इतर मार्केट एकाच परिसरात आहे. सर्वाधिक वाहतूक शाळा-महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता चौकातून जात असल्याने ये-जा करणाऱ्या महिलांची कुचंबना होते. या परिसरात मोठ्या प्रमाणात नाल्यांची दुर्गंधी व न.प. कार्यालयासमोर अस्वच्छता राहते.
पालिकेत होत असलेला हा प्रकार श्रेय लाटण्यासाठी होत असल्याची चर्चा आहे. कामे मंजूर व निधी असताना ती झाली नाही. शिवाय त्याचकामासाठी पुन्हा नव्याने ठराव घेत मंजुरी मिळाली, यातून हाच संदेश मिळत आहे.
आठवडी बाजाराच्या विकासकामांचे भूमिपूजन चार वर्षापुर्वीच माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. या परिसरातील बाजार ओटे व मार्केटचे आधुनिक बांधकाम व विकासकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. पालिकेला त्यासाठी फक्त पुढाकार घेणे गरजेचे होते. निदान विकास कामात तरी राजकारण करण्याची गरज नव्हती.
- अमर काळे, आमदार, आर्वी
बाजार ओट्याच्या कामाकरिता पालिकेच्या सर्वधारण सभेत हा विषय चर्चेला आला. याकरिता किती निधीची तरतुद केली याची माहिती घ्यावी लागेल.
- दुर्गेश पुरोहित, नगराध्यक्ष, आर्वी
चार वर्षांपासून या कामाचा निधी व प्रशासकीय मंजुरी झाली असताना कामाचे श्रेय लाटण्यासाठी हा निधी जाणिवपुर्वक विकासकामासाठी खर्च करण्यात आला नाही. विकासकामात सर्वांनी सहकार्याची भूमिका गरजेची आहे.
- किरण मिस्कन, माजी नगराध्यक्ष