रेहकीच्या शेतकऱ्यांची मदतीसाठी फरफट
By Admin | Updated: February 7, 2015 23:28 IST2015-02-07T23:28:18+5:302015-02-07T23:28:18+5:30
यावर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला. शासनाने दुष्काग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक ‘पॅकेजची’ घोषणा केली. याचा लाभ मिळण्याकरिता महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या.

रेहकीच्या शेतकऱ्यांची मदतीसाठी फरफट
सेलू : यावर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला. शासनाने दुष्काग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक ‘पॅकेजची’ घोषणा केली. याचा लाभ मिळण्याकरिता महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत पोहचविण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या तातडीच्या सुचना असल्याने गती आली; मात्र रेहकी या गावातील तलाठ्याच्या दुर्लक्षितपणामुळे तेथील शेतकऱ्यांपैकी एकाचेही नाव मदतीच्या यादीत नसल्याने मोठा घोळ झाला. याचा फटका तेथील शेतकऱ्यांना बसत आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करताना तलाठ्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली. यावेळी त्याला निलंबित करण्यात आले. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल तसाच पडून राहिला. दुसऱ्या तलाठ्याकडे पदभार देण्यास २२ दिवसांचा कालावधी लागला. तलाठी एस. आर. चेन्नुरवार यांनी पदभार स्वीकारला; मात्र त्यांनी शेतकऱ्यांना मिळाणाऱ्या मदतीकरिता आवश्यक असलेल्या याद्यांकडे दुर्लक्ष केले.
याच काळात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतनिधी देण्याचे काम जोरात सुरू झाले. रेहकी येथील शेतकऱ्यांच्या याद्या विहित मुदतीत पोहचल्या नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली नाही. या सर्व प्रक्रीयेची जराही कल्पना नसल्याने शेतकरी आपली मदत बँकखात्यावर जमा झाली, असे समजून बँकेच्या चकरा मारू लागला. मात्र चौकशी अंती घडलेला प्रकार कळल्यावर आपण मदतीपासून आता मुकणार, अशी शेतकऱ्यांची धारणा झाली.
नवीन तलाठ्याला शेतकरी स्वत: जावून भेटले असता शसनाकडे रक्कम शिल्लक राहिली तर तुम्हाला मिळेल अन्यथा काही खरे नाही, असे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. आता आपण या मदतीपासून वंचित तर होणार नाही ना? अशी भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.(तालुका प्रतिनिधी)
तयार केलेल्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयात पडून
येथील ग्रामपंचायतीद्वारे दवंडी देवून शेतकऱ्यांचे खाते क्रमांक मागवून घेतले होते. ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या तयार केलेल्या यादीवर टाकण्यात आले. हे कार्य सुरू असतानाच येथील तलाठी लाचलुचपत विभगाच्या जाळ्यात अडकला. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या काळात या याद्यांकडे दुर्लक्ष झाले. त्या याद्याचा गठ्ठा ग्रामपंचायतीत तसाच पडून राहिल्याने या शेतकऱ्यांना मदत मिळेल अथवा नाही याची भीती वाटू लागली आहे.
नवीन पटवाऱ्याने त्या याद्या गोळा करून लवकरात लवकर बँकेत जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी गावात जोर धरत आहे.