८१८ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद
By Admin | Updated: February 17, 2017 02:05 IST2017-02-17T02:05:45+5:302017-02-17T02:05:45+5:30
जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० अशा एकूण १५० जागांकरिता गुरुवारी मतदान झाले.

८१८ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद
जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता मतदान : सकाळपासूनच केंद्रावर मतदारांची गर्दी; प्रक्रिया शांततेत
वर्धा : जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० अशा एकूण १५० जागांकरिता गुरुवारी मतदान झाले. या जागांकरिता ८१८ उमेदवार रिंगणात होते. या सर्वच उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे. काही मतदार केंद्रावर रांगा असल्यामुळे अंतिम आकडेवारी उशिरापर्यंत प्राप्त झाली नव्हती. जिल्ह्यात ६३ टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून वर्तविला. मतदार याद्यांच्या घोळामुळे हजारोनागरिक मतदानापासून वंचित राहिले.
अंतिम आकडेवारीनुसार आष्टी (शहीद) तालुक्यात ६५, आर्वी ६७, समुद्रपूर ७४.५७ व देवळी ६९ टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी न आल्याने हिंगणघाट ७०, वर्धा ५३, कारंजा (घा.) ६५ व सेलू ६८ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ७ लाख ३१ हजार ९९२ मतदरांपैकी ३ लाख ४३ हजार ५९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १ लाख ७८ हजार ८३६ पुरूष तर १ लाख ६४ हजार ७५६ स्त्री मतदारांचा समावेश आहे. असे असले तरी हिंगणी, घोराड, आंजी (मोठी), येळाकेळी, झडशी, तळेगाव (टालाटुले), सावंगी, केळझर, वायगावसह अनेक मतदान केंद्रवर सायंकाळी ५.३० वाजतानंतरही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा कायम होत्या.
जिल्ह्यात ९६१ केंद्रांवर सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला. कोरा येथील एक केंद्र वगळता जिल्ह्यात कुठेही इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे वृत्त नाही. येथे अर्धा तास उशिराने मतदान सुरू झाले. जिल्ह्यात सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून आला. सावंगी, वायगाव येथे भर दुपारीही मतदारांची गर्दी असल्याचे दिसून आले. मतदानाकरिता महिलांचा प्रतिसाद असलयाचे दिसून आले. असे असले तरी मतदार याद्यांच्या घोळामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आल्याचे दिसून आले. अनेकांना केंद्रावर असलेल्या याद्यांत त्यांची नावे दिसली नसल्याने त्यांनी परतीचा मार्ग धरला. यामुळे वर्धा शहरातलगत असलेल्या भागात त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.