सफाई कामगार दाम्पत्याचे नगर पंचायतसमोर उपोषण
By Admin | Updated: April 13, 2016 02:24 IST2016-04-13T02:24:28+5:302016-04-13T02:24:28+5:30
१९ वर्षांपासून येथील मनोज सारसर व त्यांची पत्नी आशा सारसर हे दोघे सफाई कामगार म्हणून कार्यरत होते.

सफाई कामगार दाम्पत्याचे नगर पंचायतसमोर उपोषण
१९ वर्षे लोटूनही : नोकरीत कायम केले नसल्याचा आरोप
आष्टी (श) : १९ वर्षांपासून येथील मनोज सारसर व त्यांची पत्नी आशा सारसर हे दोघे सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. प्रदीर्घ काळ सेवा देऊनही तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व आताच्या नगर पंचायत प्रशासनाने त्यांना कायम न केल्यामुळे या दाम्पत्याने सोमवारपासून नगर पंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
येथे ग्रामपंचायत असताना २८ फेब्रुवारी २०१५ व ३० मार्च २०१५ रोजी तीन कर्मचाऱ्यांना कामावर घेवून तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या तीनही कर्मचाऱ्यांना कायम केले. त्यामुळे १९ वर्षांची सेवा देऊनही आपणास कायम करण्यापासून डावलले असून हा आपणावर झालेला अन्याय आहे असे सफाई कामगार मनोज सारसर यांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायत असताना या दोघांनी १९ वर्षे शहरातील रस्ते झाडण्याचे काम केले.
आता नगरपंचायतने शहरातील सफाईचे काम ठेकेदाराकडे दिले. ठेकेदारांनी या सफाई कामगार जोडप्यास काही दिवस कामावर ठेवून नंतर कामावरून कमी केले. त्यामुळे त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार उपोषणकर्त्यां दाम्पत्याने व्यक्त केला आहे.
अन्याय निवारण समिती आष्टीचे अध्यक्ष प्रा. बी. टी. उरकुडे यांनी ४ एप्रिल रोजी नगर पंचायतीच्या अध्यक्षांना यासंदर्भात लेखी निवेदन देऊन त्यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले. नगर पंचायत प्रशासनाने पूर्ववत त्यांना कामावर घेवून त्यांना सेवेत कायम करावे.
शासन नियमानुसार त्यांना वेतन सुरू करावे अन्यथा आष्टी अन्याय निवारण समितीतर्फे जनआंदोलन करण्याचा इशाराही नगर पंचायत प्रशासनास प्रा. उरकुडे यांनी दिला आहे. सध्या नगर पंचायती समोर अन्यायग्रस्त सारसर दाम्पत्य उपोषणाला बसले आहेत. उपोषणाची दखल घेऊन दाम्पत्यास न्याय मिळवून देण्याची मागणी समितीद्वारे केली जात आहे.(प्रतिनिधी)
१८ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या नगर पंचायतच्या सभेत या सफाई कामगार पती पत्नीस कायम करण्यासंबंधी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. ठेकेदाराने या जोडप्यास कामावरून कमी केले होते. पण त्यांना पूर्ववत कामावर घेण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या आहेत. त्यामुळे ते आज कामावरून कमी झालेले नाही. दोन्ही सफाई कामगारांची १९ वर्षांची सेवा लक्षात घेता त्यांच्यावर अन्याय होणार नाही, यासाठी नगरपंचायत प्रशासन कटीबद्ध आहे.
- मीरा येणूरकर, अध्यक्ष नगर पंचायत, आष्टी.