उपोषणामुळे लहानआर्वीच्या मागण्या मंजूर

By Admin | Updated: June 19, 2014 00:12 IST2014-06-19T00:12:56+5:302014-06-19T00:12:56+5:30

लहानआर्वी ग्रा़पं़ हद्दीतील अनेक समस्या धूळखात पडून होत्या. याविरूद्ध सरपंच सुनील साबळे यांनी आमरण उपोषण सुरू केले़ या उपोषणात संपूर्ण ग्रामस्थ सहभागी झाल्याने प्रशासन जागे झाले़

Fasting Approved Small Orders | उपोषणामुळे लहानआर्वीच्या मागण्या मंजूर

उपोषणामुळे लहानआर्वीच्या मागण्या मंजूर

दूरसंचारच्या अभियंत्याला घेराव : अनेक कामांचा मार्ग मोकळा
आष्टी (श़) : लहानआर्वी ग्रा़पं़ हद्दीतील अनेक समस्या धूळखात पडून होत्या. याविरूद्ध सरपंच सुनील साबळे यांनी आमरण उपोषण सुरू केले़ या उपोषणात संपूर्ण ग्रामस्थ सहभागी झाल्याने प्रशासन जागे झाले़ अखेर बुधवारी आ़ दादाराव केचे यांच्यासह सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावात येऊन मागण्या मंजूर केल्या़ यामुळे उपोषणाची सांगता करण्यात आली़
चार हजार लोकसंख्येच्या गावात बीएसएनएलचे टॉवर नाही. यामुळे गावातील भ्रमणध्वनी सेवा ठप्प आहे. याबाबत दूरसंचारच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन दिलीत; पण दखल घेतली नाही. यामुळे आमरण उपोषण करताना टॉवरच्या मागणीला प्राधान्य देण्यात आले़ गावात टॉवर मंजूर होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा निर्धार ग्रामस्थांनी केला. कर्मचारी अभियंता नंबोदरी गावात येताच त्यांना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला. उडवाउडवीची उत्तरे देत त्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला; पण ग्रामस्थ संतप्त झाले. सर्वांनी कार्यकारी अभियंत्याला झाडाला बांधण्याचे ठरविले. धास्तावलेल्या अभियंत्याने ३ महिन्यात टॉवरची उभारणी करण्याचे लेखी पत्र दिले. पावसाळ्याचे दिवस असल्याने एवढ्या दिवसात टॉवर उभारणे शक्य नाही म्हणून ग्रामस्थांनी आणखी तीन महिन्यांची अधिक मुदत दिली. सहा महिन्यांत टॉवर न झाल्यास कार्यकारी अभियंत्याच्या वर्धा कार्यालयात आमरण उपोषण करण्याचा निर्णय सरपंच साबळे यांनी व्यक्त केला.
पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करून भाड्याच्या घरात सुरू करणार व नंतर इमारत बांधणार असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. वानखेडे यांनी दिली. आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अ‍ॅलोपॅथी दवाखाना मंजूर झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.आर. चव्हाण यांनी लेखी दिली. यामुळे ग्रामस्थांना त्वरित आरोग्यसेवा मिळणार आहे. लहानआर्वी-अंतोरा रोडवरील वाघाडी नाल्यावर पूल बांधकामाचे इस्टीमेट तयार करून प्रस्ताव पाठविल्याची माहिती सा़बां़ विभागाचे उपविभागीय अभियंता नरेश लभाने यांनी लेखी दिली. आष्टी-मोर्शी रोडवरील लहानआर्वी येथील श्रीराम मंदिर ते सुजातपूर-विठ्ठलापूर (पोरगव्हाण) कडे गेलेली पांदण वनविभागाच्या हद्दीत येते. त्यासाठी १.४० मीटरची जागा वनविभागाने ग्रा़पं़ ला सुपूर्द केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.व्ही. तळणीकर यांनी दिली. पांदण रस्ता कामासाठी २१ लाखांचे इस्टीमेट तांत्रिक मंजुरीसाठी जि.प. बांधकाम उपविभागाला पाठविल्याचे सांगितले. लहानआर्वी-जैतापूर रस्त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आ़ केचे यांनी दिली. कामाचे टेंडर काढल्याचेही त्यांनी सांगितले़ गारपीटग्रस्तांना मदत वाटपात भेदभाव केला़ याचा सरपंच साबळे, आ़ केचे व ग्रामस्थांनी निषेध करून कारवाईचा ठराव घेतला. सर्व मागण्या लेखी स्वरुपात मंजूर झाल्याने निंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.(प्रतिनिधी)

Web Title: Fasting Approved Small Orders